सहा वर्षांच्या समृद्धीला हवा मदतीचा हात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:34+5:302021-06-09T04:23:34+5:30
थॅलेसिमिया मेजर आजाराने ग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी १५ लाखांचा खर्च अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील सुभाषराव लांडे ...
थॅलेसिमिया मेजर आजाराने ग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी १५ लाखांचा खर्च
अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील सुभाषराव लांडे यांच्या सहा वर्षांच्या मुलीला थॅलेसिमिया मेजर या दुर्मीळ आजाराने ग्रासले असून तिच्यावर होणाऱ्या बोन मॅरो या शस्त्रक्रियेसाठी १५ लाख रुपये खर्च येणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन समृद्धीच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
पारस येथील सुनील लांडे हे अल्पभूधारक शेतकरी असून आपल्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली असून त्यापैकी मोठी मुलगी समृद्धी हिला थॅलेसिमिया आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तिला अहमदाबाद येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यासाठी तिच्यावर बोनमॅरो ही महागडी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एक सामान्य कुटुंबातील माणूस एवढी मोठी रक्कम कोठून आणणार, हा मोठा प्रश्न सध्या या कुटुंबासमोर आहे. त्यामुळे सहा वर्षांची समृद्धी या आजाराशी झगडत असून यातून तिला बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येण्याची गरज आहे. मदतीसाठी सुनील सुभाषराव लांडे यांच्यासोबत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
सोशल मीडियावरूनही मदतीचे आवाहन
उपचाराचा खर्च १५ लाख असल्याने समाजातील जागृत व सेवाभावी व्यक्तींनी रविवार ६ जूनपासून सोशल मीडियावर विशेष म्हणजे व्हॉट्सॲपवर ‘हेल्प फॉर समृद्धी’ असा मदतीचा ग्रुप सुरू करून मदतीचे कॅम्पेन चालविले आहे. गत २४ तासात दीड लाख रुपयांची मदत मिळाली आहे. आणखीही मदतीची गरज असल्याने दानशूरांनी मदत करून पुढाकार घेण्याची गरज आहे. आपली एक मदत समृद्धीसाठी वरदान ठरू शकते.