गृह अलगीकरणाच्या परवानगीसाठी रुग्णांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:20+5:302021-04-15T04:18:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : संसर्गजन्य काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गृह अलगीकरणात राहावे लागते़. त्यासाठी महापालिकेच्या ...

Helping patients to seek home segregation | गृह अलगीकरणाच्या परवानगीसाठी रुग्णांना हेलपाटे

गृह अलगीकरणाच्या परवानगीसाठी रुग्णांना हेलपाटे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : संसर्गजन्य काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गृह अलगीकरणात राहावे लागते़. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून ‘हाेम क्वाॅरंटाईन’साठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे़. मागील काही दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्रमाणपत्र देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना झाेन कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे़. काेराेनाबाधित रुग्णांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे़.

जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा ‘डबल म्युटेड स्ट्रेन’ आढळला असून, यामध्ये १५ टक्के रुग्ण या नव्या प्रकारातील असण्याची शक्यता वैद्यकीय यंत्रणांकडून वर्तवली जात आहे़. काेराेना विषाणूच्या जनुकीय बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वीच्या काेराेनाच्या तुलनेत आता काेराेनाचा वेगाने प्रसार हाेत आहे़. फेब्रुवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रात दरराेज किमान २०० काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत़. काेराेनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना किमान १४ दिवस गृह अलगीकरणात राहावे लागते़. अशा रुग्णांना गृह अलगीकरणासाठी मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे़. दरम्यान, प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णांना स्वत: झाेन कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे़, अशावेळी मनपाने रुग्णांना तातडीने प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे दाखले देत चालढकल केली जात असल्याची माहिती मिळत आहे़. यामुळे अशा रुग्णांना झाेन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने काेराेनाच्या संसर्गाची शक्यता बळावली आहे़

रुग्णांची थेट मनपात धाव

गृह अलगीकरणासाठी प्रमाणपत्र देण्यात झाेन कार्यालयांकडून चालढकल केली जात असल्यामुळे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक थेट मनपामध्ये धाव घेत आहेत़. यामुळे मनपा वर्तुळात काेराेनाच्या संक्रमणाचा धाेका वाढला आहे़.

घरांवर चिन्हं लावले, प्रमाणपत्र का नाही?

शहरात केंद्रीय पथक आढावा घेणार असल्याच्या धास्तीने मनपाच्या यंत्रणेने घाईघाईत अनेक रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे चिन्हं लावण्याची औपचारिकता निभावली़. रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच व लाल रंगाचे चिन्हं लावण्याची प्रक्रिया करतानाच संबंधितांना तातडीने प्रमाणपत्र का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़.

शहरात ९०७९ रुग्ण ‘हाेम क्वाॅरंटाईन’

महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेकडे प्राप्त अहवालानुसार १४ एप्रिलपर्यंत शहरात ९०७९ रुग्ण ‘हाेम क्वाॅरंटाईन’ आहेत़. यापैकी १,६५७ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे़. संबंधितांकडे प्रमाणपत्र आहेत का, याची प्रशासनाने शहानिशा करण्याची गरज आहे़.

Web Title: Helping patients to seek home segregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.