हिमोफिलियावर आता अकोल्यातच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:02 AM2020-08-02T10:02:16+5:302020-08-02T10:03:18+5:30

अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांना आता अकोल्यातच उपचार घेता येणार आहे.

Hemophilia now being treated in Akola! | हिमोफिलियावर आता अकोल्यातच उपचार!

हिमोफिलियावर आता अकोल्यातच उपचार!

Next

अकोला : रक्ताशी निगडित ‘हिमोफिलिया’ आजारावर आता अकोल्यातच उपचार शक्य होणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात गुरुवारी हिमोफिलिया डे-केअर युनिटचे उद््घाटन झाले. त्यामुळे अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांना आता अकोल्यातच उपचार घेता येणार आहे.
‘हिमोफिलिया’ हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभवतो. अशा रुग्णाला योग्य वेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी राज्यात विभाग स्तरावर डे केअर युनिट सुरू करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट होते; मात्र आता अकोल्यातदेखील डे-केअर युनिट सुरू झाल्याने हिमोफिलियाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात डे-केअर युनिटचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, नोडल अधिकारी डॉ. नारायण साधवाणी यांच्यासह हिमोफिलिया सोसायटीचे अध्यक्ष मो. अकीब मो. आरीफ, उपाध्यक्ष सैय्यद कयुम सैय्यद नूर, सचिव पारितोष सैय्याम, उपसचिव शर्मिला सैय्याम यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.


पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर उपचार
हिमोफिलिया डे-केअर युनिटचे उद््घाटन केल्यानंतर पहिल्याच दिवशी हिमोफिलियाच्या तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले. या तिन्ही रुग्णांना इंजेक्शन देण्यात आले.

दोन वर्षांपूर्वीच मिळाली होती मंजुरी
अकोल्यातील हिमोफिलिया डे केअर युनिटला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली होती; परंतु तांत्रिक अडचणीत युनिट रखडले होते. त्यानंतर मार्च महिन्यात युनिट सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली होती; मात्र लॉकडाऊनमुळे ते पुन्हा रेंगाळले होते.


अकोल्यासाठी हिमोफिलिया डे-केअर युनिट दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते; मात्र गुरुवार ३० जुलै रोजी युनिटला सुरुवात झाली. अमरावती येथून फॅक्टर ८ चे मुबलक इंजेक्शन उपलब्ध झालेत; परंतु आणखी औषधांसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी केली जात आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

Web Title: Hemophilia now being treated in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.