अकोल्यात हेपेटाइटिस ‘बी’चे २००,‘सी’चे ८४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:37 PM2019-11-24T12:37:34+5:302019-11-24T12:37:49+5:30
राज्यातील हजारो रुग्णांना हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रक्तपेढ्यांमधील संकलित रक्ताच्या चाचण्यांमध्ये राज्यातील हजारो रुग्णांना हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आजार सुप्त असल्याने हेपेटाइटिसची लागण झाल्याचे रुग्णांना कळत नाही. त्यामुळे त्याचा धोकाही वाढला आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत राज्यभरातील रक्तपेढ्यांकडून हेपेटायइटिस ‘बी’ व ‘सी’च्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
हेपेटाइटिस बी आणि सी हे दोन्ही आजार सुप्त असल्याने रुग्णांना सहज लक्षात येत नाहीत. कावीळ झाला तरच तपासणी करून या आजाराची चाचणी केल्या जाते; परंतु रक्तपेढ्यांमधील संकलित रक्ताच्या तपासणीमध्ये शंभरातून दोन ते तीन जणांना हा आजार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या रक्त नमुन्यांमध्ये हा आजार आढळला, ते रक्त रक्तपेढ्यांकडून नष्ट करण्यात येत होते. शिवाय, यासंदर्भात संबंधित रुग्ण किंवा आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत नव्हते.
त्यामुळे या दोन्ही आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र सेल तयार करण्यात आला असून, राज्यभरातील सर्वच रक्तपेढ्यांकडून अशा रुग्णांची माहिती मागविण्यासंदर्भात राज्याचे आरोग्य सेवा आयुक्तांनी गत आठवड्यात ‘व्हिडिओ कॉफरन्सी’द्वारे राज्यभरातील सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार राज्यभरातील रक्तपेढ्यांकडून अशा रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून संकलित केली जात आहे.
असे असेल स्वतंत्र सेलचे कार्य
रक्तपेढ्या व एड्स नियंत्रण कक्षातून रुग्णांची माहिती संकलित करणे.
रुग्णांशी संपर्क करून त्यांचे समुपदेशन करणे.
‘एचएलएल’ कंपनीमार्फत हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’चा ‘व्हायरल लोड’ तपासणे.
तपासणी अहवालानुसार एनसीडी सेंटर अंतर्गत रुग्णांवर उपचार करणे.
हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’चा धोका वाढाला!
रक्तपेढ्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीनुसार, गत एक-दीड वर्षात अकोल्यात हेपेटाइटिस ‘बी’चे २००, तर हेपेटाइटिस ‘सी’चे ८४ रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या रुग्णांना आतापर्यंत उपचारच न मिळाल्याने त्यांच्यापासून इतरांनाही हा आजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य आरोग्य सेवा आयुक्तांच्या निर्देशानुसार रक्तपेढ्यांकडून हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’च्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या रुग्णांचे समुपदेशन, वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र सेलची निर्मिती करण्यात आली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.