अरे हे काय चाललंय....तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, वॉर्डबॉय घेतोय रुग्ग्णांचे स्वॅब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 10:58 AM2020-12-18T10:58:12+5:302020-12-18T11:02:26+5:30
Akola News चक्क वॉर्डबॉयकडून नागरिकांचे स्वॅब घेतले जात असल्याचे लोकमतने गुरुवारी पातूर तहसील कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले.
संतोषकुमार गवई
पातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेण्यात येत आहेत. तज्ज्ञ डॉक्टर स्वॅब घ्यावे असे अपेक्षित आहे. परंतु आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करून चक्क वॉर्डबॉयकडून नागरिकांचे स्वॅब घेतले जात असल्याचे लोकमतने गुरुवारी पातूर तहसील कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. आरोग्य विभागाकडून बळजबरीने पकडून स्वॅब घेतल्या जात असल्याचा आरोप काही स्वॅब दिलेल्या नागरिकांनी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून तालुक्यांच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेण्यात येत आहे. तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांनी स्वॅब घेणे अपेक्षित आहे. त्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे नागरिकांच्या घशातील कोणत्या भागातून स्वॅब घ्यायचा, याचा अभ्यास आहे. परंतु शरीरशास्त्र, शरीररचना माहीत नसलेल्या वॉर्डबॉयकडून नागरिकांचे स्बॅब घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी पातूर तहसील कार्यालयात दिसून आला. अकोला येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांची चमु पातूरला येऊन बळजबरीने नागरिकांना कोरोना चाचणी करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा तक्रार यावेळी अनेकांनी केली. या चमूसोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाही. डॉक्टर नाहीत. परिचारिका आणि एक वॉर्डबाय नागरिकांच्या घशातील स्वॅब संकलन करीत असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शरीरशास्त्राचा कोणताही अभ्यास नसताना, वॉर्डबॉय कसा काय स्वॅब घेऊ शकतो? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेताना, रुग्णास काही बाधा झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, पातूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा स्वॅब सुद्धा वॉर्डबाॅयनेच घेतला. स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित यंत्रणा आवश्यक असताना, अप्रशिक्षित वॉर्डबाॅयकडून स्वॅब संकलन केले जात असल्याने, नागरिक कोरोना तपासणी करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे बळजबरीने नागरिकांना पकडून त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत.
वॉर्डबॉय स्वॅब घेऊ शकत नाही !
पातुरातील खासगी डॉक्टरांना याविषयी विचारणा केल्यावर, त्यांनी वॉर्डबॉयला शरीरशास्त्राचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्याला नागरिकांचे स्वॅब घेता येत नाहीत. प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिकाच स्वॅब घेऊ शकतात. स्वॅबमुळे नाकातील अतिशय संवेदनशील भागाला गंभीर इजा होऊ शकते, अशी माहिती दिली.
स्वॅब संकलनाचे काम केवळ प्रशिक्षित डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, एएनएम, जीएनएम परिचारिका आणि ज्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास आहे. तोच व्यक्ती करू शकतो.
डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
गुरुवारी माझ्यासह कुटुंबातील सदस्यांचे वॉर्डबॉयने स्वॅब घेतले. आरोग्य चमू निवासस्थानी आल्यावर आम्ही सर्वांनी नमुने दिले.
दीपक बाजड, तहसीलदार
माझं आणि परिवाराचे स्वॅब नमुने तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाठविलेल्या टिमला दिले. -दीपक बाजड
तहसीलदार, पातूर
‘माझे दोन दिवसांचे स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण झाले असून, मला हॉस्पिटल मॅनेजर यांनी सांगितले की तुम्हाला स्वॅब घ्यायचे आहे’
कपिल पोहरे
कक्षसेवक, पातूर