कोरोना रुग्णाची माहिती दडवली; आता उपचारासाठी नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:54 AM2020-06-29T10:54:33+5:302020-06-29T10:54:43+5:30
अपार्टमेंटमधील रहिवाशी स्वत:वर उपचार करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : जुने शहरातील श्रीवास्तव चौक परिसरात एका अपार्टमेंटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाची माहिती दडविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या रुग्णावर उपचार करण्यास विलंब झाल्याने त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतरही अपार्टमेंटमधील रहिवाशी स्वत:वर उपचार करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. अपार्टमेंटमधील नागरिकांचा मुक्तसंचार लक्षात घेता स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुने शहरातील श्रीवास्तव चौक परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली; परंतु या अपार्टमेंटची बदनामी होईल या विचारातून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती सामूहिकरीत्या दडविण्यात आली. त्यामुळे सदर व्यक्तीवर उपचार करण्यास विलंब झाला. या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी संबंधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांनी महापालिका प्रशासनाला सूचना देणे अपेक्षित होते. तसे न करता रहिवाशांनी जाणीवपूर्वक चुप्पी साधणे पसंत केले आहे.
सामूहिक बैठकीत घेतला निर्णय
संबंधित अपार्टमेंटमधील नागरिकांनी कोरोनाबाधित रुग्णाची माहिती दडविण्यासंदर्भात सामूहिक बैठकीचे आयोजन केले होते. त्यामुळे या दबावापोटी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णाने व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीसुद्धा मनपाला अवगत केले नसल्याची माहिती आहे.
मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण
अपार्टमेंटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतरही इतर रहिवाशांचा परिसरात मुक्तसंचार असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण आहे.
या गंभीर प्रकाराकडे महापालिका लक्ष देणार का, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती दडविल्याप्रकरणी अपार्टमेंटमधील नागरिकांवर गुन्हा दाखल करणार का, मनपा कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करणाºया व्यक्तींवर कारवाई करणार का, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मनपा कर्मचाºयांसोबत अरेरावी
संबंधित अपार्टमेंटमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब परिसरातील स्थानिक रहिवाशांना समजल्यानंतर त्यांनी मनपा प्रशासनाला सूचित केले. त्यामुळे अपार्टमेंटचा परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित करून त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचाºयांसोबत सदर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अरेरावी करून त्यांना हुसकावून लावल्याची माहिती आहे.