कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ५० वर्षावरील वयोगटातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:06 AM2020-12-06T11:06:03+5:302020-12-06T11:06:29+5:30
Akola CoronaVirus News २९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून, त्यातील ७८.१८ टक्के मृत्यू हे ५० वर्षावरील वयोगटातील आहेत.
अकोला: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून, त्यातील ७८.१८ टक्के मृत्यू हे ५० वर्षावरील वयोगटातील आहेत. त्यांच्यात मधुमेह, हृदय व मूत्रपिंडासंदर्भातील जुन्या व्याधींची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बाधितांच्या संपर्कात आल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होते; मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांच्यात लवकर लक्षणे दिसतात. अनेक ज्येष्ठांमध्ये जुन्या व्याधी असल्याने त्यांच्यात लक्षणे अधिक तीव्रतेने आढळतात. तेच युवकांमध्ये लक्षणे दिसत नसल्याने तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शक्यतो ५० ते ६० वर्षावरील वयोगटावरील नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे. याशिवाय जुन्या व्याधी असणाऱ्यांनीही गर्दी किंवा बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींपासून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
वयोगटानुसार स्थिती
वयोगट - रुग्णसंख्या
० ते ५ - ००
५ ते १० - ००
११ ते २० - ००
२१ ते ३० - ०९
३१ ते ४० - १७
४१ ते ५० - ३९
५१ ते ६० - ७४
६० पेक्षा जास्त - १५९
८३ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर सप्टेंबर महिन्यात दिसून आला. सप्टेंबरच्या ३० दिवसांत ३ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण, तर ८३ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ महिन्यातील हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. ऑक्टोबर महिन्यात मात्र मृत्यूचा दर काही प्रमाणात नियंत्रणात आला होता.
ग्रामीण भागात जास्त मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव हा महापालिका क्षेत्रातून झाला; मात्र हळूहळू कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होऊ लागला. महापालिका क्षेत्रात थैमान घातल्यावर ग्रामीण भागातही कोरोनाचे बळी जाऊ लागले. जिल्ह्यात आतापर्यंत २९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण - ९,६२६
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ८,६७९
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ६४९