राज्यात सर्वाधिक शेततळी पश्चिम विदर्भात
By admin | Published: March 5, 2016 02:26 AM2016-03-05T02:26:21+5:302016-03-05T02:26:21+5:30
मागेल त्याला शेततळे; पश्चिम विदर्भासाठी १३,२१५ शेततळ्यांचे लक्ष्यांक.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात ५१ हजार ५00 शेततळ्यांचे लक्ष्यांक असून, सर्वाधिक शेततळी पश्चिम विदर्भात उभारले जाणार आहेत. २0१६-१७ मध्ये पश्चिम विदर्भात १३ हजार २१५ शेततळी उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता, शेतकर्यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही वैयक्तिकलाभाची योजना राबविण्यात येत आहे. सन २0१६-१७ मध्ये ह्यमागेल त्याला शेततळेह्ण या योजनेंतर्गत राज्यात सुमारे ५१ हजार ५00 शेततळी उभारण्यात येणार असून, सर्वाधिक शेततळी उभारण्यासाठी विदर्भावर भर देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती विभाग व नागपूर विभागात एकूण २१ हजार ६९३ शेततळी उभारण्यात येणार आहेत. त्यातही पश्चिम विदर्भात १३ हजार २१५ शेततळी होणार असून, राज्यातील एकूण शेततळ्यांपैकी सर्वाधिक शेततळ्यांचे लक्ष्यांक पश्चिम विदर्भासाठी देण्यात आले आहे.
अमरावती विभागानंतर लातूर विभागात ९ हजार ५९७, नागपूर विभागात ८ हजार ४७८, औरंगाबाद विभागात ६ हजार ६0३, नाशिक विभागात ५ हजार ९२८, पुणे विभाग ५ हजार ५८१ व सर्वांत कमी कोल्हापूर विभागात २ हजार ९८ शेततळी उभारण्यात येणार आहेत. ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील बीपीएल शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गत पाच वर्षांत एक वर्ष तरी ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. गत तीन वर्षांपासून वारंवार दुष्काळ पडून पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी येत असल्याने या योजनेत पश्चिम विदर्भास प्राधान्य मिळत आहे.
विदर्भातील जिल्हानिहाय शेततळे
अमरावती विभागात १३ हजार २१५ शेततळी होणार असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २६११, अकोला २११0, वाशिम १८९२, अमरावती ३१५९ व यवतमाळ जिल्ह्यात ३४४३ शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. नागपूर विभागात ८४७८ शेततळी होणार असून, त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात २0३४, नागपूर १८२९, भंडारा ८५२, गोंदिया ४६0, चंद्रपूर १९६३ आणि गडचिरोली जिल्ह्यात १३४0 शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे.