अकोला बाजार समितीत सोयाबीनला विदर्भातून सर्वाधिक दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

By रवी दामोदर | Published: October 23, 2023 12:28 PM2023-10-23T12:28:40+5:302023-10-23T12:29:02+5:30

रविवारी बाजार समितीत प्रतिक्विंटल ४,८७५ रुपये दर प्राप्त झाला, तर तब्बल १० हजार कट्ट्यांची आवक झाली.

Highest price for soybeans from Vidarbha in Akola market committee; Big relief to farmers | अकोला बाजार समितीत सोयाबीनला विदर्भातून सर्वाधिक दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोला बाजार समितीत सोयाबीनला विदर्भातून सर्वाधिक दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोला : दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीस आणल्या जात आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढली आहे. विदर्भातून सर्वाधिक दर अकोला बाजार समितीत प्राप्त होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या १२० वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच सुटीच्या दिवशी बाजार समितीत व्यवहार सुरू होते. रविवारी बाजार समितीत प्रतिक्विंटल ४,८७५ रुपये दर प्राप्त झाला, तर तब्बल १० हजार कट्ट्यांची आवक झाली.

जिल्ह्यात सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून, बाजारात आवक वाढली आहे. यंदा पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यात सुरुवातीला दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. आता सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली असून, विदर्भामध्ये सर्वाधिक दर अकोला बाजार समितीत प्राप्त होत आहे. रविवारी बाजार समितीत प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये दर प्राप्त झाले आहे.

इतिहासात पहिल्यांदा सुटीच्या दिवशी व्यवहार सुरू
बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. गत दोन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो क्विंटल माल भिजला. त्यामुळे खबरदारी म्हणून व दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती प्रशासनाने रविवारी म्हणजेच सुटीच्या दिवशी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता खरेदीदार, अडते, हमाल कामगार, मापारी कामगार, मुनिम, बाजार समितीचे कर्मचारी आदी सर्वांनी एकमत करीत सुटीच्या दिवशी व्यवहार सुरू ठेवण्यास प्रतिसाद दिला. बाजार समितीच्या १२० वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच धान्य बाजार सुटीच्या दिवशी (रविवारी) सुरू राहिला असून, तब्बल १० हजार कट्ट्यांची आवक झाली.

अकोला बाजार समितीत आवक वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. तसेच आगामी दिवस सुटीचे असल्याने शेतकऱ्यांचे हित सर्वतोपरी ठेवून सुटीच्या दिवशी बाजार समितीत व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्वांचाच प्रतिसाद मिळाला असून, पुढेही शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी असे निर्णय घेण्यात येतील.
- शिरीष धोत्रे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.
 

Web Title: Highest price for soybeans from Vidarbha in Akola market committee; Big relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.