शिवाजी महाविद्यालयाने दत्तक घेतलेली रुबिना विद्यापीठात अव्वल
By admin | Published: July 4, 2016 01:43 AM2016-07-04T01:43:14+5:302016-07-04T01:43:14+5:30
हलाखीच्या परिस्थितीवर मात करून कॉम्प्यूटर सायन्स या शाखेत अमरावती विद्यापीठातून प्रथम.
अकोला : स्थानिक शिवाजी महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या रुबिना परविन अब्दुल शकील या विद्यार्थिनीने हलाखीच्या परिस्थितीवर मात करून एम.एस.सी. कॉम्प्यूटर सायन्स या शाखेत अमरावती विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मे २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या एमएससी (कॉम्प्यूटर सायन्स) या परीक्षेत चमकदार कामगिरी करीत रुबिनाने ७.७0 ग्रेड मिळविला असून, ती संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आली आहे. यासाठी तिला सुवर्णपदक मिळणार आहे.
स्थानिक शिवाजी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असलेली रुबिना परवीन ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणावर खर्च करण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती. परंतु, रुबिनाला उच्च शिक्षण घ्यायचे होते. ही बाब शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुबिनाला वर्ष २0१४ मध्ये दत्तक घेतले व तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. रुबिनानेही या संधीचे सोने करीत कठोर परिश्रम व अभ्यासाच्या बळावर यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर तिने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तयारी केली. यासाठी तिला महाविद्यालयातील प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. मे महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये रुबिना अमरावती विद्यापीठातून प्रथम आली आहे. अभ्यासात हुशार असलेली रुबिना इतर क्षेत्रातही आघाडीवर आहे. ह्यइनोव्हेशनह्णसाठी तिला विद्यापीठाकडून ह्यकलर कोटह्ण मिळाला आहे. रुबिनाला भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असून, आगामी काळात स्पर्धा परीक्षांवर भर देणार असल्याचे तिने ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.