देशाच्या सर्वांगीण प्रगतीत हिंदीचे अमूल्य योगदान
By admin | Published: September 14, 2014 01:47 AM2014-09-14T01:47:05+5:302014-09-14T01:47:05+5:30
हिंदी दिवसाच्या पूर्वसंध्येला हिंदी साहित्यिकांचे मुक्त चिंतन
अकोला : हिंदी ही राज्यघटनेनुसार आमची राजभाष आहे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न होत आहेत; परंतु काही मूठभर लोकांच्या विरोधामुळे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही हिंदीला तो दर्जा मिळू शकला नाही. हिंदी भाषेचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अमूल्य योगदान आहे. हे लक्षात घेऊनच हिंदीला राष्ट्रभाषा बनविणे योग्य ठरेल, असे मत अकोल्यातील हिंदीच्या दिग्गज साहित्यिकांनी शनिवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्ण कार्यालयात हिंदी दिवसाच्या पूर्वसंध्येला शनिवारी ह्यभारत की उन्नती मे हिंदी का योगदानह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत हिंदी साहित्यिक डॉ. मनि खेडेकर, डॉ. रामप्रकाश वर्मा, कवी घनश्याम अग्रवाल, अशोक नेमा, डॉ. प्रमोद शुक्ला, महेश शुक्ला व डॉ. सुरेश केशवानी सहभागी झाले होते. हिंदी स्वातंत्र्य चळवळीचीदेखील भाषा होती. राष्ट्रीय एकात्मता आणि व्यवहाराची भाषा म्हणूनदेखील हिंदी रुढ आहे. देशाचा बहुमुखी विकास हिंदी भाषेतूनच झाला. अशा परिस्थितीत हिंदीला विरोध करणे चुकीचे आहे. राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळणे दूर नाही, असे वक्त्यांनी सांगितले. आधुनिक माध्यमांमध्येदेखील हिंदीचा वापर अधिक करता येऊ शकतो. संगणक, मोबाईल या माध्यमातून हिंदीचा प्रचार आणि प्रसार करता येऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षादेखील वक्त्यांनी व्यक्त केली. हिंदी भाषा पूर्वी होती, आजही आहे आणि भविष्यातदेखील तिचे अस्तित्व राहील, यात कुठलीही शंका नाही, असे सांगताना या वक्त्यांनी सर्वांनी मिळून हिंदीचे जतन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.