हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात हिंदू अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:23 PM2018-05-29T14:23:42+5:302018-05-29T14:23:42+5:30
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात सप्तम अ.भा. हिंदू अधिवेशन होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
अकोला: जगामध्ये अनेक राष्ट्रे धर्मावर आधारित आहेत; परंतु या देशात ९0 कोटी हिंदू असूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी हिंदू राष्ट्र म्हणून भारताला घोषित करण्यात आले नाही. हिंदू राष्ट्र स्थापन व्हावे आणि त्याविषयीची दिशा निश्चित करण्यासाठी १९ राज्यांमधील संघटना एकत्र आल्या आहेत. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात सप्तम अ.भा. हिंदू अधिवेशन होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पिसोळकर यांनी, जगामध्ये अनेक इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध धर्मीय राष्ट्रे आहेत; परंतु या देशात बहुसंख्यक असूनही आम्हाला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही. केवळ मतांसाठी आणि सोयीच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगतात. भाजप सरकारने मुस्लिमांची हज यात्रेची सबसिडी बंद करून त्यांना हज यात्रेसाठी ४0 टक्क्यांनी विमानाचे भाडे कमी केले. काश्मीरमधील हिंदू निर्वासिताचे जिणे जगत आहेत. गोहत्या बंदी केवळ कागदावर असून, या कायद्यामुळे गोहत्या थांबलेली नाही. हिंदू मंदिरांमधील कोट्यावधी रुपयांच्या देणग्यांचा हिशेब नाही. हा पैसा जातो, कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच आता हिंदू जनजागृती समितीने १९ राज्यांमधील हिंदू संघटना एकत्र केल्या आहेत. यासह नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश येथील १५0 हून अधिक हिंदू संघटनांचे पदाधिकारी गोव्यातील २ ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या सप्तम हिंदू अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामध्ये हिंदूंचे संरक्षण, मंदिर रक्षण, इतिहासाचे रक्षण, धर्मांतरण, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन यासह हिंदूंचे युवा संघटन, संत संघटन आणि हिंदू राष्ट्राची स्थापना याविषयी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात अकोला जिल्ह्यातून २३ प्रतिनिधी, अधिवक्ता सहभागी होणार आहेत. अशी माहितीही श्रीकांत पिसोळकर यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा सेविका मेघा जोशी, अॅड. प्रशांत गोरे, निधी बैस, श्याम राजंदेकर, अजय खोत, धीरज राऊत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)