हिंदुत्व आमचा श्वास, आम्हाला काेणी शिकवू नये! - गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:14 AM2021-01-12T10:14:03+5:302021-01-12T10:20:40+5:30
Gulabrao Patil News राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.
अकाेला: हिंदुत्व हा शिवसैनिकाचा श्वास आणि ध्यास आहे. याबाबत आम्हाला काेणीही शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. आगामी सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पाणी पाजणार असल्याचा विश्वास त्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केला.
शिवसेना नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी येताच त्यांनी साेमवारी अकोला येथे पक्षाची बैठक घेतली. जिल्हाप्रमुख तथा आ.नितीन देशमुख यांनी आयाेजित मेळाव्यात मंत्री पाटील यांनी विराेधकांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देशातील सर्वाधिक प्रभावी नेते असल्याचा आम्हा शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे. आजवर अनेक पक्षातील मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री, खासदार, आमदार फुटले,मात्र सच्चा शिवसैनिक कायम सेनेच्या साेबत असल्याचे मंत्री पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना हा प्रखर हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही फक्त जनहिताचाच विचार करतो. त्यामुळे माझ्यासारखा साधा शिवसैनिक आज मंत्रीपदावर विराजमान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख तथा आ.नितीन देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा लेखाजाेखा मांडला. आगामी दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना व वंचित बहुजन आघाडी हे दाेनच पक्ष राहतील,असे नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सेनेचे सह संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, राजेश मिश्रा तसेच जिल्ह्यातील तालुका प्रमुख शहर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश गीते यांनी केले. यावेळी राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता करण्यात आली.