'लाॅकडाऊन'पासून अकोला बसस्थानकावरील हिरकणी कक्ष कुलुपबंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:42 AM2021-01-04T11:42:15+5:302021-01-04T11:42:29+5:30
Akola Bus Stand मुख्य बसस्थानकावरील हिरकणी कक्ष हा लाॅकडाऊनपासून बंदच आहे याची खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : प्रत्येक बसस्थानकात स्तनदा मातेला बाळाला स्तनपान देण्यासाठी हिरकणी कक्ष आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या हिरकणी कक्षाला कुलूप लावलेले दिसत असल्याने हिरकणी कक्ष केवळ शोभेची वास्तू बनला आहे. काही ठिकाणच्या कक्षाची दुरवस्था झाली असल्याने महिलांची कुचंबणा होते. अकाेल्याच्या मुख्य बसस्थानकावरील हिरकणी कक्ष हा लाॅकडाऊनपासून बंदच आहे याची खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही नाही
एसटी महामंडळाच्या योजनेला घरघर लागली असून, अनेक प्रवाशांना योजना माहिती सुद्धा नाहीत. बाळाला पाजण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर असलेल्या हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असते. तर काही ठिकाणी कक्ष खुले ठेवण्यात येत असले तरी त्याठिकाणी प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिलांना तेथे जाणे असुरक्षित वाटते. परिणामी काही बसस्थानकावरील कक्षांचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे.
यापूर्वीही हिरकणी कक्षामध्ये एसटी महामंडळाने भंगार सामान ठेवलेले हाेते या बाबत ‘लाेकमत’ ने लक्ष वेधल्यानंतर हिरकणी कक्ष पुन्हा सुस्थीतीत करण्यात आला मात्र आता पुन्हा हा कक्ष लाॅकच आहे या कक्षाबाहेर अनेक प्रवासी विश्रांती घेतांना दिसत आहेत त्यामुळे या कक्षात जाण्यास महिला धजावत नाहीत.
मागणी झाल्यास चावी उपलब्ध करून देतो
मध्यंतरी कोरोना संसर्ग काळात हिरकणी कक्ष बंदच होता. तसेच काही रिकामटेकडे या कक्षासमोर बसलेले असतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा कक्ष बंद ठेवण्यात येत आहे. या कक्षाची चावी मात्र चौकशी कक्षात सदैव उपलब्ध असते. कोणी मागणी केल्यास त्यांना या ठिकाणी चावी मिळू शकते.
- अरविंद पिसोळे, आगारप्रमुख, अकोला