ऐतिहासिक रथोत्सवाने फेडले डोळ्याचे पारणे
By admin | Published: November 8, 2014 11:40 PM2014-11-08T23:40:06+5:302014-11-08T23:40:06+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे संत सोनाजी महाराज महोत्सवाची सांगता.
चंद्रप्रकाश कडू / सोनाळा (बुलडाणा)
संत सोनाजींच्या नावाचा जयजयकार करीत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सोनाजी महाराजांच्या रथयात्रा महोत्सवाची सांगता दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला.
श्री संत सोनाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवाचा ३१ ऑक्टोबरला प्रारंभ झाला होता. आज, शनिवार ८ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या रथाच्या परिक्रमेने व दहीहांडीने सांगता करण्यात आली. हभप मधुकर महाराज साबळे पळसखेडकर यांचे कीर्तन होऊन १२ वाजता संत सोनाजी महाराजांच्या प्राचीन तीन मजली भव्य लाकडी रथाची पूजा करण्यात आली. हजारो हातांनी हार, झेंडुची फुले व नारळांनी महाराजांचा रथ सजविला होता. हा रथ दोरखंडाच्या साह्याने वाजतगाजत टाळमृदंग व फटाक्यांच्या आतषबाजीत प्रकाशबाबा मंदिराजवळ नेण्यात आला. यामध्ये सांप्रदायिक असंख्य भजनी दिंड्यांनी भाग घेतला होता. रथाची भक्तीभावाने पूजाअर्चा करुन रात्री १२ वाजता निघालेला रथ प्रकाश बाबांच्या मंदिरासमोर पोहोचला.
तद्नंतर ८ नोव्हेंबरला सकाळी प्रकाशबाबांच्या मंदिरासमोरून महाराजांच्या रथाला हलविण्यात आले. दुपारी १२ वाजता रथ नियोजित स्थळी पोहोचला. १२ वाजता श्री संत सोनाजी महाराज मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्त संत नगरी सोनाळा येथे आलेल्या परिसरातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांनी महाप्रसाद घेतला. ज्वारीची भाकरी, उडीदाची दाळ, अंबाडीची भाजी असे महाप्रसादाचे स्वरूप असते. १११ पोते ज्वारीच्या महाप्रसादाची परंपरा आजही मागील ३00 वर्षांपासून सुरु आहे. महाप्रसादाला दुपारी १ वाजता सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंंत हा महाप्रसाद सुरु होता. महाप्रसाद वितरण सुरळीत होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे रामदास पांडव गुरुजी यांनी संचालन केले.