अकोल्याच्या इतिहासाला ‘स्मृतींच्या मशाली’ने मिळाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 04:29 PM2019-12-15T16:29:58+5:302019-12-15T16:32:06+5:30
दिलीप देशपांडे यांच्या कसदार अभिनयाने शंभर वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्यलढ्यातील रोमांचकारी घटना जशाच्या तशा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : विस्मृतीच्या अंधकारात गेलेल्या शूरवीरांच्या कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्मृतींच्या मशाली’ या केशव यशवंत ओक (चंदू ओक) लिखित पुस्तकावर आधारित नाट्यप्रयोगाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी प्रमिलाताई ओक सभागृहात यशस्वी झाला. दिलीप देशपांडे यांच्या कसदार अभिनयाने शंभर वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्यलढ्यातील रोमांचकारी घटना जशाच्या तशा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपातळीवर घडणाऱ्या सगळ््या घटनांचा पडसाद अकोल्यात उमटत होते. अकोलेकरांनीदेखील या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले योगदान दिले; मात्र हा इतिहास दुर्दैवाने समोर आला नाही; मात्र ‘स्मृतींच्या मशाली’ या नाट्यप्रयोगाने आता हा इतिहास घराघरात पोहोचणार आहे. लोकमान्य टिळकांची अकोल्यातील सभा, या सभेला प्रत्यक्ष संत गजानन महाराज यांची उपस्थिती, राजगुरूंचे अकोल्यातील छुपे वास्तव्य आदी प्रसंगांना प्रेक्षकांनी भरभरू न दाद दिली. स्वातंत्र्याच्या लढाईत अकोलेकरही लढले. अकोल्यात छुप्या रीतीने बॉम्ब बनविल्या जायचे. एकदा बॉम्ब बनविताना बॉम्बस्फोट झाल्याने ब्रिटिशांना कळले होते की, अकोल्यात बॉम्ब तयार केले जातात. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक देवीदास गरड आणि त्यांच्या सहकार्यांना त्यावेळी तुरुंगात डांबले गेले होते. अच्युतराव देशपांडे, प्रमिलाताई ओक, मुनी गुरुजी अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी अकोल्यात राहून क्रांतिकारकांना मदत केली होती. महात्मा गांधींच्या हाकेला ‘ओ’ देत स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिली. राष्ट्रीय शाळा, बाबूजी देशमुख वाचनालय येथून क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध कटकारस्थान आखत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अकोल्यात काय घडले, अकोल्याच्या भूमीवर घडलेला थरार हा दिलीप देशपांडे यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून अकोलेकरांपर्यंत पोहचविला. अकोलेकर नाट्यरसिकांनी प्रयोगाला भरभरू न प्रतिसाद दिला.
तत्पूर्वी, निर्माते प्रा. नितीन ओक, लेखक धनंजय देशपांडे आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. भालचंद्र उखळकर, दीपक देशपांडे, अनिल गरड, नितीन ओक यांनी सत्कार स्वीकारला. नाटकाला प्रमोद गोल्डे यांची प्रकाशयोजना, मुकुंद कुळकर्णी, राजू बुडुकले, श्रीनिवास उपासनी यांचे संगीत लाभले. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांचे विशेष सहाय्य मिळाले. अजय शास्त्री, संतोष गवई यांचेदेखील सहकार्य नाटकाला लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भूषण फडके यांनी केले.