औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:54 PM2020-01-12T13:54:16+5:302020-01-12T13:55:09+5:30

नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे.

HIV patients life in danger due to Lack of medicine | औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात!

औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात!

Next

- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशभरात एचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांचा तुटवडा असून, त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांना बसत आहे. राज्यात थर्ड लाइन औषधांसाठी ‘एआरटी’चे केवळ सहा केंद्र असून, या ठिकाणी रुग्णांना सात ते आठ गोळ्याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गत दीड महिन्यांपासून सर्वत्र एचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांचा तुटवडा आहे.
एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. या ठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लाइन औषधे दिली जातात; परंतु गत वर्षभरापासून राज्यात एचआयव्हीच्या या औषधांचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्यांऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढीच औषधे दिली जात आहेत. दरम्यान, नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या (नॅको) निर्देशानुसार, एआरटी केंद्रांना स्थानिक स्तरावरच औषध खरेदीबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली; मात्र औषध खरेदीसाठी ई-टेंडरच्या प्रक्रियेला दिरंगाई होत असल्याने एचआयव्हीच्या रुग्णांसाठी अडचणी वाढल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला येथील एआरटी केंद्रावरच थर्ड लाइन औषधांचा पुरवठा केला जातो; मात्र येथील औषध पुरवठाही महिना दीड महिना पुरेल एवढाच शिल्लक असल्याची माहिती एआरटी केंद्राच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

विदर्भासाठी अकोला एकमेव केंद्र
विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी अकोल्यातील एआरटी केंद्र एकमेव केंद्र आहे. विदर्भातील जवळपास १८४ पेक्षा जास्त एचआयव्ही रुग्णांवर थर्ड लाइन औषधांचा उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

तामिळनाडूत एकाचा मृत्यू
एचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांअभावी तामिळनाडूतील तंबरम (जिल्हा कद्दुलोर) येथील एका रुग्णाचा शनिवार, ११ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अकोल्यातील विहान संस्थेतर्फे माहिती देण्यात आली.

एचआयव्ही रुग्णांसाठी थर्ड लाइन औषधे अत्यंत महत्त्वाची असून, ती न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. गत दीड महिन्यांपासून औषधांचा तुटवडा असून, तामिळनाडूत एकाचा मृत्यू झाला आहे. खासगीत ही औषधे उपलब्धच नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका आहे.
- गौतम ढाले, सचिव, नेटवर्क आॅफ बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही (विहान), अकोला.

 

Web Title: HIV patients life in danger due to Lack of medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.