हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव मंत्रालयात धडकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:08+5:302020-12-30T04:25:08+5:30
हिवरखेड : हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव अखेर नगरविकास मंत्रालयात धडकला असून, शासनाचा वेळ, श्रम, मनुष्यबळ आणि वारेमाप पैसा वाया ...
हिवरखेड : हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव अखेर नगरविकास मंत्रालयात धडकला असून, शासनाचा वेळ, श्रम, मनुष्यबळ आणि वारेमाप पैसा वाया जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायतऐवजी थेट नगरपरिषद किंवा नगरपंचायतची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी हिवरखेडवासीयांनी केली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात आवाज उचलल्यानंतर जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव अखेर नगरविकास मंत्रालयात धडकला असून, आता शासनाच्या अधिसूचनेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ४० हजारांच्यावर लोकसंख्या, १८ हजारच्या जळपास मतदार असलेले हिवरखेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गत २० वर्षांपासून हिवरखेडवासीयांचा नगरपंचायतसाठी संघर्ष सुरू आहे. त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव जि.प. सीईओ सौरभ कटियार यांनी तत्काळ हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात पाठविला. हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धडकल्यामुळे हिवरखेड नगरपंचायतबाबत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. हिवरखेड ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर काही दिवसातच नगरपंचायतीचा निर्णय झाल्यास ग्रामपंचायत निवडणूक औपचारिक मात्र ठरणार आहे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीऐवजी थेट नगरपंचायतीची निवडणूक घेण्याची मागणी हिरवखेडवासीयांकडून होत आहे.
--------------------
हिवरखेड नगरपंचायत प्रस्तावित असल्याने नगरविकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोग यांनी योग्य निर्णय घेऊन नगरपंचायत घोषित करून थेट नगरपंचायतची निवडणूक घ्यावी.
- धीरज बजाज, सामाजिक कार्यकर्ते, हिवरखेड
-----------------------------
विधिमंडळाच्या अधिवेशनात हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषद अथवा नगरपंचायतमध्ये रूपांतरण करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारनेसुद्धा लोकसंख्येच्या तुलनेत सकारात्मकता दाखविली असून, सीईओ व जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मंत्रालयात पाठविला आहे. यासंदर्भात पाठपुरावा करत असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
- अमोल मिटकरी, आमदार, विधान परिषद