पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 04:08 PM2019-09-06T16:08:16+5:302019-09-06T16:08:28+5:30
जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला.
अकोला: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. याकरिता हॉकीअकोला संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील हॉकीचे ज्येष्ठ खेळाडू व नवोदित खेळाडू यांनी आपसात मैत्रीपूर्ण सामना खेळून पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला. जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला.
जिल्ह्यातील वरिष्ठ हॉकी खेळाडूंच्या पुढाकाराने प्ले फॉर चॅरिटी मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदान येथे केले होते. या सामन्यात ज्येष्ठ खेळाडूंच्या संघाने विजय मिळविला. यानंतर ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मैत्रीपूर्ण सामन्यानंतर ज्येष्ठ खेळाडू, नवोदित खेळाडू, हॉकी संघटना व उपस्थित प्रेक्षकांकडून जमा झालेली रक्कम पूरग्रस्त विभागात मुख्यमंत्री साहाय्यता निधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली. सात हजार रुपयांचा धनादेश हॉकी संघटनेचे सचिव धीरज चव्हाण व कोषाध्यक्ष मयूर निंबाळकर, लक्ष्मीकांत उगवेकर, प्रशांत खापरकर, स्वप्निल अंभोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला. या उपक्रमाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक करण्यात आले.