होळी, धूलिवंदन यंदाही नियमातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 02:51 PM2021-03-27T14:51:30+5:302021-03-27T14:51:48+5:30
Corona shadow on Holi धूलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर संडे यासणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत
अकोला- काेराेनाच्या उद्रेकामुळे गेल्यावर्षी हाेळी व धूलिवंदन हे उत्सव काेराेना नियमावलीतच साजरे झाले हाेते. यंदाही तीच परिस्थिती कायम असून २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होळी, धूलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर संडे यासणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सण अत्यंत साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
कोणत्याही प्रकारे गर्दी न करता हा सण साजरा करावा. धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाणे साजरे करावे. काही ठिकाणी होळी शिमग्यानिमित्त मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी होणार नाही याची काळजी घेत दर्शनाची सोय करावी. कोणत्याही प्रकारे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये.
गुड फ्रायडे व इस्टरची प्रार्थनाही नियमात
२८ मार्च ते दि.४ एप्रिल या होलीविक दरम्यान प्रत्येक प्रार्थनासभेच्या वेळी चर्चमध्ये उपलब्ध जागेनुसारच लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. जास्तीत जास्त ५० व किमान १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. सामाजिक अंतर कायम राहिल, याची खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार चार ते पाच प्रार्थना सभांचे वेगवेगळ्या वेळी आयोजन करावे. प्रार्थनेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याची खबरदारी घ्यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून घ्यावी. या सणांनिमित्त दिले जाणारे संदेश सोशल मीडियातून प्रसारित करावे. चर्चच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. मिरवणुका व गर्दी आकर्षित होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये. असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहेत.