सुटीचाही आला मुलांना कंटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:41+5:302020-12-30T04:24:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात पहिल्यांदाच वर्षभर शाळाच भरली नाही. शाळेला बुट्टी मारणारे ‘बॅक बेंचर’ही अक्षरश: शाळेत जाण्यासाठी आसुसले. पण शाळा काही उघडली नाही. काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात शाळांची लांबलेली सुटी मुलांना भावली मात्र या सुटीचाही कंटाळा आला. दुसरीकडे माेबाइलला हात लावू नका, असे दरडावणारे पालक आता मुलांसाठी स्वतंत्र माेबाइल खरेदी करून घे माेबाइल, बस अभ्यासाला अशा पवितत्र्यात आले. असे हे आगळेवेगळे वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवून संपत आहे.
परीक्षेचीही झाली गंमत
परीक्षा म्हटलं की मुलांना प्रचंड धास्ती बसत असे; मात्र ऑनलाइन परीक्षेचा उडालेला गाेंधळ पाहून शाळेचीच परीक्षा घेतली गेली. मार्चमध्ये कोरोना अवतरल्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात घालण्यात आले. काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्यांची परीक्षा घेतली, त्यात पालकांनीच पेपर दिले. दहावीचा तर चक्क भूगोलाचा पेपरच रद्द करावा लागला. बारावीची कशीबशी परीक्षा झाली; पण रिझल्ट लावता-लावता बोर्डाच्या नाकीनऊ आले.
विद्यापीठाच्या परीक्षांचा घोळच घोळ
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. पण वेळेवर लाॅगीन न होणे, एका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मिळणे असे खेळ झाले. मग ती परीक्षा रद्द करून दुसऱ्यांदा आयोजन केले. तर ऐनवेळी विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचा निरोप देण्यात आला.
काेराेना तपासणीच्या रांगेत शिक्षक
कोरोना संकटाची काळजी घेत २३ नोव्हेंबरपासून काही वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सव्वाशे शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.
आश्रमशाळा ‘अनलाॅक’ नाहीतच
शालेय शिक्षणाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र विद्यार्थी उपस्थिती अगदीच नगण्य आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकासच्या अखत्यारीतील आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाल्यावरही त्या अनेक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
‘फीट इंडिया’त जिल्हा राज्यात तिसरा
फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.