कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची गृहचौकशी पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:04+5:302021-05-31T04:15:04+5:30
अकोला : कोरोनाकाळात २१ मे पर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांची गृहचौकशी जिल्हा महिला व बालविकास ...
अकोला : कोरोनाकाळात २१ मे पर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांची गृहचौकशी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या बालसंरक्षक कक्षामार्फत पूर्ण करण्यात आली असून, गृहचौकशीचा अहवाल सोमवार, ३१ मे रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याने १८ वर्षांआतील बालकांचे पालक गमावले आहेत. त्यामध्ये काही बालकांची आई व काही बालकांचे वडील हिरावले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांचे सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे ७४ बालकांचे पालक गमावले आहेत. त्यामध्ये काही बालकांची आई तर काही बालकांच्या वडिलांचा समावेश आहे. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या बालसंरक्षण कक्षामार्फत संबंधित बालकांची गृहचौकशी करण्याचे काम २९ मे पर्यंत पूर्ण करण्यात आले. या गृहचौकशीत घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सोमवार, ३१ मे रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.
गृहचौकशीत बालकांची अशी
घेण्यात आली माहिती !
कोरोनामुळे जिल्ह्यात पालक गमावलेल्या बालकांची गृहचौकशी करण्यात आली. त्यामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक असलेली मदत, शासनाकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे इत्यादी मुद्यांची माहिती घेण्यात आली.
बालसंगोपन योजनेचा
लागू होणार लाभ!
कोरोना विषाणू संसर्गामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ लागू करण्यात येणार आहे. या योजनेत बालकांना दरमहा प्रत्येकी १ हजार १०० रुपयांची मदत मिळणार आहे.
कोरोनाकाळात २१ मे पर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची गृहचौकशी करण्याचे काम जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या बालसंरक्षक कक्षामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. गृहचौकशीमध्ये घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार आहे.
विलास मरसाळे,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अकोला