गावागावांत ‘होम क्वारंटाइन ’ रुग्णांची होणार तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 10:29 AM2021-05-23T10:29:30+5:302021-05-23T10:31:20+5:30
Akola News : कोरोनाबाधित रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात आता गावागावांत तपासणी करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, गृहविलगीकरणातील (होम क्वारंटाइन) कोरोनाबाधित रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात आता गावागावांत तपासणी करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी (एसडीओ), उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), गटविकास अधिकारी (बीडीओ), तहसीलदार व ठाणेदारांच्या पथकांकडून ‘होम क्वारंटाइन’ रुग्णांची झाडाझडती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना, ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरू असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘होम क्वारंटाइन’ रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्ती घरातच राहून घरातच राहतात की नाही, होम क्वारंटाइन रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती घरात न थांबता बाहेर फिरतात काय, यासंदर्भात महसूल, पोलीस व ग्रामविकास विभागाच्या पथकांच्या चमूकडून २२ मेपासून अकोला तालुक्यात तपासणी सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चमूकडून अकोला तालुक्यातील गावागावांत भेटी देऊन संबंधित तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यासह ‘होम क्वारंटाइन ’ रुग्ण घरातच आहेत की नाहीत, यासंदर्भात तपासणी करणार आहेत. या तपासणीत ‘होम क्वारंटाइन’ रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्ती घरातच थांबतात की बाहेर फिरतात यासंदर्भात झाडाझडती घेण्यात येणार आहे.
उगवा, सुकोडा येथे केली तपासणी!
अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, गटविकास अधिकारी राहुल शेळके यांच्यासह संबंधित ठाणेदार व तलाठी, ग्रामसेवकांनी शनिवारी अकोला तालुक्यातील उगवा व सुकोडा या दोन गावांना भेट देऊन कोरोनाबाधित ‘होम क्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ‘होम क्वारंटाइन ’ रुग्ण घरातच असल्याचे आढळले.
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोला तालुक्यात कोरोनाबाधित ‘होम क्वारंटाइन’ रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती घरातच आहेत, की बाहेर फिरतात, यासंदर्भात शनिवारपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावांत यासंदर्भात तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये ‘होम क्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाहीत, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.
- डाॅ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, अकोला