अकोला जिल्ह्यातील कोतवालांना मिळणार मानधन वाढीचा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:27 PM2019-03-04T13:27:34+5:302019-03-04T13:28:07+5:30
अकोला: राज्यातील कोतवालांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोतवालांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: राज्यातील कोतवालांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोतवालांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
कोतवालांच्या कामाचे स्वरूप, त्यांची पूर्णवेळ शासकीय कामाशी बांधीलकी विचारात घेता, कोतवालांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव ८ जानेवारी २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कोतवालांना देण्यात येत असलेल्या मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार वाढ करण्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत कोतवालांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
कोतवालांच्या मानधनात अशी करण्यात आली वाढ!
कोतवालांना २०१२ पासून दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. त्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार १० वर्षे सेवा कालावधी झालेल्या कोतवालांना आता दरमहा ७ हजार ५०० रुपये, ११ ते २० वर्षे सेवा कालावधी झालेल्या कोतवालांना ७ हजार ७२५ रुपये, २१ ते ३० सेवा झालेल्या कोतवालांना ७ हजार ८०० रुपये आणि ३१ वर्षांपेक्षा जास्त सेवा कालावधी झालेल्या कोतवालांना ७ हजार ८७५ रुपये दरमहा मानधन दिले जाणार आहे.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालास १५ हजार!
कोतवालांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ करण्यात आली आहे. तथापि, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक कोतवालास दरमहा १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोतवालांना सध्या मिळणाऱ्या पाच हजार रुपये मानधनाच्या तुलनेत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांच्या मानधनात आता तिप्पट वाढ करण्यात आली आहे.
जिल्ह्यात असे आहेत कार्यरत कोतवाल!
तालुका कोतवाल
अकोला ४१
अकोट २८
तेल्हारा २६
बाळापूर २५
पातूर १९
बार्शीटाकळी २४
मूर्तिजापूर ३१
..................................
एकूण १९४