जिह्यात दुष्काळी सवलतींची आस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:46+5:302021-01-25T04:19:46+5:30
संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले ...
संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे शासनामार्फत जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होणार तरी केव्हा, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिकांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम सरासरी पैसेवारी ४७ पैसे आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्याचा आदेश शासनाकडून केव्हा काढण्यात येणार, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.
लागवडीयोग्य गावांतील अंतिम
पैसेवारीचे असे आहे वास्तव!
तालुका गावे पैसेवारी
अकोला १८१ ४६
अकोट १८५ ४८
तेल्हारा १०६ ४५
बाळापूर १०३ ४७
पातूर ९४ ४८
मूर्तिजापूर १६४ ४७
बार्शीटाकळी १५७ ४८
...................................................................
एकूण ९९० ४७
‘या’ सवलती लागू होण्याची आहे प्रतीक्षा!
जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या वीज देयकांत सूट, शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीस स्थगिती इत्यादी दुष्काळी सवलती लागू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.