पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 10:44 AM2021-03-01T10:44:37+5:302021-03-01T10:44:43+5:30
Maharashtra Cabinet Minister वनमंत्री संजय राठाेड यांनी राजीनामा दिल्यामुळे पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ११ मतदारसंघांत भाजपा-शिवसेनेने विजय संपादन केला; मात्र विधानसभा सदस्याला मंत्रिपदासाठी शेवटच्या विस्तारापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी एकाला तरी मंत्रिपद मिळेल, ही अपेक्षा हाेती मात्र तीही फाेल ठरली. आता वनमंत्री संजय राठाेड यांनी राजीनामा दिल्यामुळे विदर्भातील एक मंत्रिपद कमी झाले आहे, त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे. पश्चिम विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिमचे पारडे जडच आहे. दुसरीकडे सामाजिक समीकरण लक्षात घेऊन यवतमाळमधील संजय राठाेड यांना मंत्रिपदाची संधी मिळाली हाेती. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील आ.डाॅ. संजय रायमुलकर व आ. गाेपीकिशन बाजाेरिया या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले हाेते, आता राठाेड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिपदासाठी दाव्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. बुलडाण्यातील आ. डाॅ संजय रायमुलकर हे ज्येष्ठ आमदार असून, त्यांना सध्या पंचायतराज समितीचे अध्यक्षपद दिले आहे. त्यांच्या मंत्रिपदासाठी खा. प्रतापराव जाधव यांनीही माताेश्रीवर साकडे घातले हाेते; मात्र त्यांची समजूत घालण्यात माताेश्री यशस्वी झाली हाेती. अकाेल्यातील आ. बाजाेरिया यांचाही मंत्रिपदासाठी दावा प्रबळ हाेताच, मात्र शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात त्यांचे नाव मागे पडले. आता त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या दाेन ज्येष्ठ आमदारांसह पहिल्यांदाच निवडून आलेले अकाेल्यातील बाळापूरचे आ. नितीन देशमुख व बुलडाण्याचे संजय गायकवाड या दाेघांचीही मंत्रिपदासाठी दावेदारी मानली जाते. पहिल्यांदाच निवडून आल्यावरही त्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाची छाप पाडली आहे साेबत शिवसेना पक्षसंघटनेतही लक्ष घालून माताेश्रीचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे नव्या दमाच्या नेतृत्वालाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे एकच आमदार थेट कॅबिनेट
पश्चिम वऱ्हाडात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. राज्यात सत्तांतर हाेत असताना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे ते साक्षीदारही ठरले हाेते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी देत कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. राष्ट्रवादीकडे एकच आमदार असतानाही त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी डाॅ. शिंगणे यांना मंत्रिपद दिले. साेबतच अकाेल्यातील अमाेल मिटकरी यांना विधानपरिषद बहाल करून राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाढेल, असा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. या पार्श्वभूमीवर शिवेसनेचे चार सदस्य असतानाही एकालाही मंत्रिपद नसल्याचे शल्य शिवसैनिकांमध्ये आहे. ते दूर करण्याची संधी सेना नेतृत्वाला असल्याचाही दावा मंत्रिपदासाठी केला जात आहे.