महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:31 PM2019-11-18T12:31:05+5:302019-11-18T12:31:17+5:30

इच्छुक उमेदवारांकडून सर्व पर्याय खुले ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.

Horse market is booming for mayor's post in Akola | महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत!

महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत असतानासुद्धा महापौर पदासाठी पक्षात घोडेबाजाराला ऊत आला आहे. वर्तमान स्थितीत मनपात भाजपाची सत्ता असल्याने ही संधी भविष्यात पुन्हा येणे नाही, या विचारातून आता पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून सर्व पर्याय खुले ठेवल्या जात असल्याची माहिती आहे. तरीही पक्षातून ऐनेवळेवर कोणाचे नाव समोर केल्या जाते, याबद्दल संभ्रम असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. उद्या सोमवारी महापौर, उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता भाजपाने सर्व नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अक ोलेकरांनी मनपाची सत्ता भाजपाच्या ताब्यात सोपविली. पक्षातील अनुभवी पदाधिकारी या नात्याने पक्षाने विजय अग्रवाल यांना महापौर पदाची संधी दिली.
आज रोजी महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे पक्षातील इच्छुक महिला नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
१८ नोव्हेंबर रोजी महापौर व उपमहापौर या पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले जाणार असल्याने रविवारी दिवसभर भाजपाच्या अंतर्गत गोटात गुप्त बैठका व खलबतांना ऊत आला होता. महापौर पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांकडून सर्व पर्याय खुले ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.


जि. प. निवडणुकीमुळे समीकरण बदलणार?
राज्यातील वर्तमान स्थिती ध्यानात घेता, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे चित्र आहे. अशावेळी भाजपाकडून जिल्ह्यात राजकीय व जातीय समतोल राखण्याच्या खेळीतून मराठा समाजापेक्षा इतर समाजातील महिला नगरसेविकेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेताना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार असल्याची चर्चा आहे.


११ नगरसेवक ‘वेटिंग’वर
महापौर पदावर महिला नगसेविका विराजमान झाल्यानंतर उपमहापौर पदासाठी पुरुष नगरसेवकांना संधी मिळेल, असा कयास लावल्या जात आहे. या पदासाठी ११ पुरुष नगरसेवक ‘वेटिंग’वर असल्याची माहिती आहे. महापौर पदावर खुला किंवा ओबीसी प्रवर्गातील महिलेला संधी दिल्यास उपमहापौर पदासाठी हिंदी भाषिक उमेदवाराचा पर्याय समोर येण्याची दाट शक्यता आहे.


पश्चिम मतदारसंघाला संधी मिळेल का?
पहिल्या अडीच वर्षांच्या महापौर पदावर अकोला पूर्व मतदारसंघातील विजय अग्रवाल यांना तर उपमहापौर पदासाठी अकोला पश्चिम मतदारसंघातील वैशाली शेळके यांना संधी दिली होती. त्यामुळे अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांना महापौर पदाची संधी मिळेल का, याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Horse market is booming for mayor's post in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.