रुग्णालयांची तपासणी आणखी महिनाभर; बोगस डॉक्टर रडारवर
By admin | Published: April 27, 2017 07:01 PM2017-04-27T19:01:32+5:302017-04-27T19:01:32+5:30
अकोला- ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
महापालिका, ग्रामीण क्षेत्रात ९८ रुग्णालयांची तपासणी
अकोला : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे भ्रूणहत्या रॅकेट उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार गत महिन्यात राज्यभरात सुरू झालेली खासगी रुग्णालये, दवाखाने व गर्भपात-सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम आणखी १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. ही मोहीम १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होती; परंतु आता या मोहिमेला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवायांचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळलेल्या डॉक्टर व रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने १६ मार्चपासून रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी महापालिका क्षेत्र व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत तालुका पातळीवरील रुग्णालयांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथके गठित करण्यात आली. प्रत्येक पथकात एक स्त्री व एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी, दोन कर्मचारी व पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या तपासणी मोहिमेच्या कक्षेत रुग्णालये, प्रसूतीगृहे, क्लिनिक, दवाखाने, सोनोग्राफी केंद्र यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २४७ रुग्णालये असून, त्यात ६० गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्रांचा समावेश आहे. गत महिनाभरात या मोहिमेदरम्यान महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने २९ रुग्णालयांची तपासणी केली, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तालुका स्तरावरील ६९ खासगी रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी केली. यापैकी ५१ खासगी दवाखान्यांमध्ये विविध नियमांचे उल्लंघन आढळून आले. आतापर्यंत तालुका स्तरावरील १७ पैकी १० गर्भपात केंद्र व २० पैकी १७ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींचा अहवाल तयार करून जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
तालुका स्तरावरील खासगी रुग्णालये व दवाखान्यांची तपासणी मोहीम सुरू असून, ही मोहीम आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.
रुग्णालय तपासणीच्या मोहिमेस १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २९ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, आढळून आलेल्या त्रुटींचा अहवाल जिल्हास्तरीय समितीला सुपूर्द करण्यात आला आहे.
- डॉ. फारुख शेख, आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.