रुग्णालयास आग; बेबी केअर युनिट जळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:36 AM2017-09-05T01:36:09+5:302017-09-05T01:36:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गांधी मार्गावरील एका बालरुग्णालातील बेबी केअर युनिटमध्ये शार्ट सर्किटमुळे आग लागून, फोटो थेरपी मशीन जळून खाक झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. आग लागल्याचे लगेच लक्षात आल्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही.
बालरोग तज्ज्ञ डॉ. विनायक देशमुख यांचे गांधी मार्गावर बाल रुग्णालय आहे. या रुग्णालयातील बेबी केअर युनिटमध्ये सोमवारी पहाटे ४ वाजताचे सुमारास अचानक झालेल्या शॉट सर्किटमुळे आग लागली. बेबी केअर युनिटमधून धूर व वास येत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या लक्षात आले. सदर परिचारिकेने याबाबत तातडीने डॉक्टरांना माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचार्यांनी समयसूचकता दाखवून वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर तातडीने आगीबाबत अग्निशमन दलाला कळविण्यात आले. आग लागली त्यावेळी बेबी केअर युनिटमध्ये दाखल असलेले दोन्ही बाळ त्यांच्या आईजवळ असल्याने कोणाला काही झाले नसल्याचे डॉ. विनायक देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी फायर सिलिंडरद्वारा बेबी केअर युनिटमधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत फोटो थेरपी मशीन जळून खाक झाली असून, बेबी केअर युनिटचेही नुकसान झाले आहे. यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या १0 ते १२ रुग्णांना तत्काळ दुसर्या दवाखान्यात हलविण्यात आले असून, त्यांना कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले.
-