सर्वोपचार रुग्णालयामध्ये २१0 खाटा वाढणार!
By admin | Published: September 10, 2015 02:17 AM2015-09-10T02:17:38+5:302015-09-10T02:17:38+5:30
सात वार्डांसह दोन वसतिगृहाचे विस्तारीकरण.
अकोला: पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर म्हणून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहिले जाते. पश्चिम विदर्भातील हजारो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील ५५४ खाटा कमी पडत असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रुग्णालयातील खाटा वाढवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार सर्वोपचार रुग्णालयात २१0 वाढीव खाटा वाढणार असल्याने, सात नवीन वार्ड बांधण्यात येणार आहेत. तसेच मुला-मुलींच्या वसतिगृहाचे सुद्धा विस्तारीकरण होणार आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने २१0 व केंद्र शासनाने २00 खाटा वाढवून देण्यास सहमती दर्शविली होती. त्यापैकी राज्य शासनाकडून २१0 वाढीव खाटांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठीच्या सात नव्या वार्डांचे बांधकाम, वैद्यकीय महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. सर्वोपचार रुग्णालयात दररोज अकोला जिल्हय़ासह बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्हय़ातील रुग्ण येतात. दररोज शेकडो रुग्ण भरती होत असल्याने वार्डांमधील खाटा कमी पडतात. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय महाविद्यालयास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारामुळे २१0 जागा वाढून मिळाल्या आणि त्यासाठी ३४ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्राप्त झाला. त्यापैकी १६ कोटी रुपयांच्या निधीतून २१0 खाटांसाठी सात नव्या वार्डांचे बांधकाम, वसतिगृहाचे विस्तारीकरण होणार आहे. तसेच रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे सुद्धा विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने, त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यात दोन शल्यचिकित्सागृह सुद्धा उभारले जाणार आहेत. बांधकाम विभागाकडून लवकरच निविदा बोलावून, कामास सुरुवात होणार आहे.