कृषी विद्यापीठातील वसतिगृह पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:43+5:302020-12-17T04:43:43+5:30
अकोला : कोविड रुग्णांसाठी वापरण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वसतिगृहे सध्या ओस पडली आहेत. वारंवार मागणी करूनही ...
अकोला : कोविड रुग्णांसाठी वापरण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वसतिगृहे सध्या ओस पडली आहेत. वारंवार मागणी करूनही वसतिगृहे विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने त्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या घटल्याने कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही वसतिगृहे आता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, विद्यापीठाकडून अद्यापही त्यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन जोपर्यंत वसतिगृहातील साहित्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि वसतिगृहाचे निर्जंतुकरण करत नाही तोपर्यंत ते विद्यार्थ्यांना देणार नाही. या संदर्भात विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असली तरी त्यावर ठोस निर्णय झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी ही वसतिगृहे ओस पडली आहेत. त्याचा भुर्दंड मात्र विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.
फोटो:
परिसरात स्वच्छताही नाही
जेव्हापासून येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले, तेव्हापासून वसतिगृहांची स्वच्छतादेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
घरभाडे व मेसचे दर वाढले
प्रवेशावेळी विद्यापीठाला सर्व शुल्क देऊनही विद्यार्थ्यांना खासगी खोल्यांमध्ये भाड्याने राहावे लागत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठापासून जवळ असलेल्या परिसरातच भाडेतत्त्वावर घरे घेतली. संधीपाहून अनेकांनी घरभाडे वाढवून दिल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय, जेवणाचाही अतिरिक्त खर्च विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना वसतिगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. परंतु, त्यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, जिल्हा प्रशासनासह विद्यापीठाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- विनायक सरकानाईक, कार्यकारी परिषद, सदस्य, डॉ. पं.दे.कृ.वी., अकोला