सहा महिन्यांनंतर घमघमाट; खवय्यांची पावले हॉटेलकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:16 AM2020-10-06T10:16:36+5:302020-10-06T10:16:48+5:30
Hotels open Again in Akola संध्याकाळी मात्र खवय्यांनी हॉटेलकडे मोर्चा वळविल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले हॉटेल, रेस्टारंट व बियरबार सोमवारपासून सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी दूपारपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा कायमच होती. संध्याकाळी मात्र खवय्यांनी हॉटेलकडे मोर्चा वळविल्याचे दिसून आले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक हॉटेल व्यावसायीकांनी तशी व्यवस्था केल्याचे दिसून आले अकोला शहरात हॉटेल, रेस्टारंट व बियरबार यांची संख्या ७०० च्या घरात असून जिल्हाभरात २५०० हजार प्रतिष्ठाने आहेत. तब्बल ११० कोटींची उलाढाल ठप्प झाल्यानंतर आतापर्यंत पार्सल सेवेवर तग धरून असलेले हे क्षेत्र आता नव्या आशेने ग्राहकसेवेसाठी सज्ज झाल्याचे दिसत होते. ग्राहकांचा प्रतिसाद हळूहळू मिळेल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला
स्वच्छतेवर भर
हॉटेलच्या प्रवेशद्वारापासूनच स्वच्छता व प्रसन्नता राहिल असा प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांचा आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच हॉटेलचे सर्व कर्मचारी हे मास्क
घालूनच ग्राहकांची सेवा करतील हे कटाक्षाने पाळले जाणार आहे. कॅश घेण्याऐवजी आॅनलाईन पेमेंटचाही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
मास्क शिवाय प्रवेश नाही, सेवाही नाही!
हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना मास्क बंधनकारक करण्यात आला असून ग्राहकांना सेवा देणारे सर्व कर्मचारीही मास्क घालूनच ग्राहकसेवा देतील या हे हॉटेल व्यावसायिकांना जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे.
लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच आज हॉटेलमध्ये बसुन जेवण घेतले. पुर्वीपेक्षा अधीक स्वच्छता, काळजी घेतली जात होती. हे जाणवले हेच चित्र कायम राहिले पाहिजे, दोन तिन दिवसांनी या दक्षतेचा विसर नको पडायला.
-सुधाकर पिंपळे ,
ग्राहक
ग्राहकांच्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाची भीती मनात असतनाही पहिल्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद बरा होता. आम्ही सर्व नियमांचे पालन करूनच ग्राहकांना सेवा देणार आहोत.
-ओमप्रकाश गोयनका,
हॉटेल व्यावसायिक
मेनू कार्ड बदलले
संसर्ग टाळण्यासाठी एका हॉटेलने पॉकेट मेनुकार्ड तयार केले आहे. ग्राहकांना ते कार्ड सोबत नेता येईल. एका हॉटेलमध्ये टेबलवरच मेनुकार्डचा स्टॅण्ड ठेवलेला दिसून आला. एका व्यावसायीकाने ग्राहकाला व्हाटसअॅपवर मेनु कार्ड देण्याचा पर्याय ठेवला आहे.