बोर्डी येथे घराला आग, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:17 AM2021-04-12T04:17:33+5:302021-04-12T04:17:33+5:30
बोर्डी येथे समाजमंदिराजवळील संजय रजाने यांच्या घराला अचानक आग लागली; परंतु सुदैवाने रजाने कुटुंबीय घराबाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. ...
बोर्डी येथे समाजमंदिराजवळील संजय रजाने यांच्या घराला अचानक आग लागली; परंतु सुदैवाने रजाने कुटुंबीय घराबाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, दोन क्विंटल गहू, ७० किलो हरभरा, कपडे, रोख तीन हजार रुपये असे एकूण १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा तलाठी राजाभाऊ खामकर यांनी केला आहे. अकोट येथील अग्निशमक दलाचे वाहन नादुरुस्त असल्यामुळे अंजनगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अकोट येथे नगरपालिकेचे अग्निशमन दल असून नसल्यासारखेच आहे. अग्निशमन दलाचे वाहन नादुरुस्त असणे, वेळेवर हजर न होणे ही बाब नित्त्याचीच आहे. अंजनगावहून अग्निशमन दलाचे वाहन बोर्डी येथे येण्याकरिता जवळपास १ तास लागला. मात्र, ग्रामस्थांनी बोअरवेलच्या पाण्याने व ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळाला नायब तहसीलदार हरिष गुरव, बीडीओ शिंदे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पंचबुधे, बोर्डीचे सचिव मोहोकार, तलाठी राजाभाऊ खामकर यांनी बोर्डी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि. प.चे सदस्य प्रकाश आतकड, समाधान चंदन, तुळशीराम ईस्तापे, डॉ. ताडे, संजय ताडे, सुरेश गायकवाड यांनी सहकार्य केले.
फोटो:
अकोट अग्निशमन दल नावालाच!
अकोट तालुक्यासाठी अग्निशमन दलाचे एकच वाहन असून हे वाहन नादुरुस्तच असते. अशातच रात्री-बेरात्री किंवा दिवसा कधी पण आग लागून एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु अकोट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन कधीच उपयोेगी पडत नाही. अग्निशमन वाहन केवळ नावालाच आहे.