मलकापुरातील घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:00 PM2020-03-08T17:00:56+5:302020-03-08T17:01:11+5:30
मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली.
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्या अंध विद्यालयाजवळील एका घराला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. या आगीत बाजूलाच उभी असलेले बोलेरो वाहनही जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली.
गोरक्षण रोडवरील मलकापूर परिसरातील एका घराला भीषण आग लागली. या घरातील रहिवासी व्यक्ती घराबाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. यावेळी बाजूलाच उभी असलेले बोलेरो वाहनही आगीत सापडल्याने यामध्ये असलेले केमिकल जळून खाक झाले. तसेच केमिकलमुळे सुमारे ५ लाख रुपयांचे हे वाहनही पूर्णत: जळाले. या आगीमुळे मलकापूर परिसरात धावपळ सुरू झाली होती. त्यानंतर आगीची माहिती तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या दोन वाहनांद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर नुकसानाची नेमकी माहिती समोर येणार आहे.
म्हैसपूर रोडवर कडब्याला आग
पातूर रोडवरील म्हैसपूर फाट्यावर एका शेतातील कडब्याच्या गंजीला आग लागली. यामध्ये कडबा पूर्णत: जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कडब्याची मोठी गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याचे शेतकºयाला दिसताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. कडबा जळून खाक झाल्यामुळे गुराढोरांच्या चाºयाची व्यवस्था करण्याचे संकटच शेतकºयासमोर उभे ठाकले होते. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत पूर्ण कडबा जळून खाक झाला होता.