बाळापूर नागरी पतसंस्थेतील घोटाळा सहा कोटींच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:51 PM2018-02-17T23:51:51+5:302018-02-17T23:54:44+5:30
अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून केलेला गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून केलेला गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तथा पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक गुन्हे दाखल होताच फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींचा आर्थिक गुन्हे शाखेने शोध सुरू केला आहे.
बाळापूर नागरी पतसंस्थेने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम कर्जापोटी वाटल्याचे दाखवून ही रक्कम अध्यक्षासह संचालकांनीच वापरल्याची तक्रार रामदास श्रीराम पराते रा. रंगाहट्टी बाळापूर यांनी अकोला आर्थिक गुन्हे शाखेत केली. या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी प्रकरणाचा तपास करून हा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल तयार केला व याच अहवालाच्या आधारे १६ फेब्रुवारी रोजी अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण बाळापूर पोलिसांकडे पाठविले. यावरून बाळापूर पोलिसांनी बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब, उपाध्यक्ष श्याम शेगोकार, संचालक रजीयाबेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमीदोद्दीन सै. जमीरोद्दीन, नंदकिशोर पंचभाई, मो. हनीफ मो. मुनाफ, निजामोद्दीन सफीयोद्दीन, सै. मुजीब सै. हबीब, निर्मला श्रीकृष्ण उमाळे, शे. महेबुब शे. हसन, शे. वजीर शे. इब्राहीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्यावर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यामध्ये ठेवीदारांना मोठा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष खतीबसह संचालक फरार झाले असून, आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध सुरू केला आहे.
साक्षीदारांचे बयाण नोंदविले
आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील साक्षीदारांचे बयाण नोंदविले. यासोबतच गैरव्यवहाराच्या सर्व तांत्रिक बाजूंची प्रक्रिया पूर्ण केली; मात्र या गैरव्यवहारातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांचा समावेश आहे.
बाळापूर नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहार कोटींच्या घरात आहे. हा आकडा आतापर्यंत तब्बल सहा कोटींवर असल्याचे दिसून येत आहे. तपासात आणखी घबाड समोर येण्याची शक्यता आहे.
- गणेश अणे, प्रमुख आर्थिक गुन्हे शाखा.