चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:17 PM2020-06-15T12:17:07+5:302020-06-15T12:17:19+5:30
मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता अतिक्रमित घरांमधील रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झाला असून, यासंदर्भात महापालिका तसेच जिल्हा प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मागील दोन वर्षांपासून भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून मलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम केले जात आहे. या कामादरम्यान मलवहिनीच्या बाजूला एलईडी पथदिवे उभारण्यात आले.
मलवाहिनीचे जाळे असदगड किल्ल्याच्या पूर्व दिशेला टाकण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित जागेचा गैरफायदा उचलत खिडकीपुरा भागातील स्थानिक रहिवाशांनी चक्क मोर्णा नदीच्या पात्रात अतिक्रमित घरे उभारली आहेत.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता अतिक्रमित घरांमधील रहिवाशांच्या जीवाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीला मोठा पूर आल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घरे बांधली जात असताना महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच प्रभागाचे नगरसेवक झोपा काढत होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
नदीकाठावर वीटभट्टीला परवानगी कशी?
चक्क नदीपात्रात अतिक्रमित घरे उभारली जात आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय नदीकाठावर उभारण्यात आलेल्या तब्बल चार वीटभट्ट्यांना परवानगी नेमकी कोणाची, असा सवाल नदीकाठालगतच्या रहिवाशांनी उपस्थित केला आहे.