मतांची घसरण झाली कशी?; जबाबदारीचे हाेणार सुक्ष्म अवलाेकन; भाजपा करणार विचारमंथन
By आशीष गावंडे | Published: June 20, 2024 06:36 PM2024-06-20T18:36:25+5:302024-06-20T18:39:21+5:30
खासदार डाॅ.कराड यांनी घेतला लाेकसभा निवडणुकीचा आढावा, नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला
अकोला: लाेकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातून अकाेला व नागपूरचा गड राखता आला. पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अकाेल्यात दाखल झालेले माजी केंद्रिय राज्यमंत्री तथा खासदार डाॅ.भागवत कराड यांनी मतांच्या घसरणीवर बाेट ठेवले. २०१९ मधील निवडणुकीपेक्षा यंदा ९७ हजार ४१४ मते कमी मिळाल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांवर साेपवलेल्या जबाबदारीचे सुक्ष्म अवलाेकन हाेणार असल्याचे संकेत दिले. हा पक्षातील अनेकांसाठी इशारा मानला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला. पक्षासाठी ही धाेक्याची घंटा असल्याचे ध्यानात येताच राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघात जाऊन जय, पराजय या विषयावर मंथन,चिंतन व पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्याला प्रारंभ झाला आहे. अकाेला लाेकसभा मतदार संघाची जबाबदारी खासदार डॉ.भागवत कराड यांच्याकडे सोपवल्यामुळे त्यांनी गुरुवारी शहरात दाखल हाेत भाजपच्या काेअर कमिटीमधील सुमारे १६५ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
स्थानिक हाॅटेलमध्ये भाजप निवडणूक संचालन समिती व जिल्हा, तालुका संचालन समिती, लोकप्रतिनिधी, मंडळ व आघाडी प्रमुखांच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील होते तर मंचावर प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ.वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने, लोकसभा निवडणूक संयोजक विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा आदी विराजमान होते.
विधानसभेच्या तयारीला लागा!
लाेकसभा निवडणुकीत खासदार अनुप धाेत्रे यांच्या विजयात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा माेठा वाटा आहे. या निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज हाेण्याचे आवाहन खा.डाॅ.कराड यांनी पदाधिकाऱ्यांना केले. महायुतीमधील सर्व घटक पक्षांना व नवीन कार्यकर्त्यांना साेबत घेऊन निवडणुकीला सामाेरे जाण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.