'कोरोना 'रुग्णांच्या वॉर्डात नागरिक जातात कसे? - पालकमंत्री संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:00 AM2020-06-10T10:00:43+5:302020-06-10T10:04:13+5:30
पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी चांगला संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी ) कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जातात कसे, अशी विचारणा करीत, पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी चांगला संताप व्यक्त केला. यासंदर्भात माहिती घेऊन सुरक्षा यंत्रणेसह संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी ‘जीएमसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जात असल्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जातात कसे, सुरक्षा यंत्रणा काय करते, अशी विचारणा करीत, या मुद्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी चांगला संताप व्यक्त केला. तसेच यासंदर्भात सुरक्षा रक्षकांसह संबंधितांची माहिती सादर करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ‘जीएमसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जीएमसीमधील कोरोना रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील कोणीही व्यक्ती जाता कामा नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
‘लो रिस्क’मधील रुग्णांवर लक्ष केंद्रित करा!
अकोला शहरातील ‘होम क्वारंटीन’ असलेल्या ‘लो रिस्क’ रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला दिले. ‘लो रिस्क’मधील रुग्णांपैकी हृदयविकाराचे रुग्ण किती, मधुमेहाचा आजार असलेले रुग्ण किती व ६० वर्षावरील रुग्ण किती, यासंदर्भात यादी तयार करून तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
रुग्णांना चांगले जेवण द्या!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून स्वच्छता राखण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
रुग्णांचा वारंवार आढावा घ्या; मनपाला निर्देश!
अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अॅक्टिव्ह रुग्ण, त्यामधील हायरिस्क व लो रिस्क रुग्ण किती आणि त्यामधील पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण किती, यासंदर्भात वारंवार आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला दिले.