पार्सलच्या भरवशावर रेस्टॉरंंट आणखी किती दिवस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:59 AM2020-08-24T10:59:14+5:302020-08-24T10:59:25+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेल्या काही सेवा सुरू करण्यात आल्या तर काही सेवा अंशत: सुरू करण्यात आल्या, या मध्ये रेस्टॉरंटचाही समावेश आहे. रेस्टॉरंटमध्ये बसून भोजनाची परवानगी नाही; मात्र ग्राहकांना पार्सल देता येते. सध्या या पार्सलच्याच भरवशावर रेस्टॉरंट व्यवसायाचा डोलारा उभा आहे. रेस्टॉरंटला पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही तर या व्यवसायातील अर्ध्याधिक व्यावसायिकांना रेस्टॉरंट बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे चित्र आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हाभरात ७०० च्या वर रेस्टॉरट असून, यामध्ये होणाऱ्या लाखोंच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. सध्या रेस्टॉरंटमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनही ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.
२५ हजारावर मजुरांचा उदरनिर्वाह धोक्यात
अकोला शहरात १२५ रेस्टॉरंट आहेत, तर जिल्हाभरात हीच संख्या ८०० पर्यंत आहे. या व्यवसायाच्या भरवशावर किमान २० ते २५ हजार मजूर कारागिरांचा उदरनिर्वाह आहे. खाानसामा, वेटर, मॅनेजर, हेल्पर, सफाई कामगार अशा अनेकांना या व्यवसायामुळे रोजगार मिळतो; मात्र सध्या केवळ पार्सल सुविधा सुरू असल्याने सर्वच मजुरांना रोजगार देणे रेस्टॉरंट मालकांना शक्य नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. एक खानसामा आणि आणखी दोन-तीन कामगारांच्या भरवशावरच सध्या पार्सलचा व्यवसाय केला जात आहे.
काय आहेत व्यावसायिकांच्या अडचणी?
सध्या फक्त पार्सल सेवेलाच परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हॉटेल चालकांची गैरसोय होत आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक लोक पार्सल घेण्यासही तयार नाहीत.
ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे हॉटेलसाठी लागणारा इतर खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के हॉटेल भाड्याच्या जागेत आहेत. त्यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत हॉटेलचे भाडे चालकांना तयार ठेवावे लागत आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या हॉटेलमालकांना भाडे भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्राहक हॉटेलकडे फारसे येत नसले तरी, कराचा भरणा करणे आवश्यक आहे. कर, लाइट बिल, पाणी, मजुरी यासह विविध खर्च भागविण्याची चिंता व्यावयायिकांना आहे. त्यामुळे करामध्ये सवलत देण्याची मागणी आहे.
अनेकांना दुकानासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडावे लागतात. व्यवसायच नसल्याने बँकांचे हप्ते कसे भरणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पार्सल सेवेतही घट
कोरोनापूर्वी अकोल्यात पार्सल सेवाही मोठ्या प्रमाणात होती. ती सेवा आता २५ टक्क्यांवर आली आहे. बहुतांश ग्राहक आॅनलाइन बुकिंगचा पर्याय निवडतात. आॅनलाइन कंपनीच्या माध्यमातून रेस्टॉरंटच्या मालकांना काही ग्राहक मिळत असले तरी त्याचे प्रमाण सरासरी २० ते २५ एवढेच आहे. थेट रेस्टॉरंटमध्ये येऊन आॅर्डर देणाºया ग्राहकांचे प्रमाण अवघे पाच टक्केही नसल्याचे अनेकांनी सांगितले.
अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शासनाने अनेक व्यवसायांना टाकलेल्या अटी शिथिल केल्या आहेत. आता एसटी ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रेस्टारंटमधून केवळ पार्सलची सुविधा देण्याचा नियम बंद करण्याची गरज आहे. शासनाने इतर व्यवसाय, क्षेत्रांसाठी आर्थिक सवलती दिल्या आहेत. तीच अपेक्षा रेस्टांरट व्यावसायिकांचीही आहे.
- योगेश अग्रवाल, अध्यक्ष, खाद्यपेय विक्रेते संघ, अकोला
शासनाने रेस्टारंटला पार्सल सुविधांची परवानगी दिली आहे; मात्र महामार्गांवरील धाबे, हॉटेल यांच्यासाठी ते बंधन नाही. अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर हे धाबे आहेत. कोरोना संसर्गाची भीती सर्वत्र असल्याने आम्हीसुद्धा ग्राहकांची काळजी घेऊन पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू करू शकतो. शासनाने आता तरी परवानगी दिली पाहिजे अन्यथा हे क्षेत्रच धोक्यात येईल.
- दीपक वोरा, रेस्टारंट व्यावसायिक, अकोला