विशेष रेल्वेच्या नावाखाली आणखी किती दिवस चालणार प्रवाशांची लूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:12+5:302021-07-14T04:22:12+5:30
अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ...
अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येत असल्याने, महागडे आरक्षित तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे ठरत आहे. कोरोनाच्या नावाखाली विशेष रेल्वे चालवून रेल्वे प्रशासन आणखी किती दिवस प्रवाशांची लूट चालवणार आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे. देशभरात सुरू असलेल्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही. शिवाय या गाड्यांमध्ये दैनंदिन पास, दिव्यांग व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह सामान्य जनता जास्तीचे भाडे भरून मेटाकुटीस आली आहे.
अकोला स्थानकावरून जातात या रेल्वे
अहमदाबाद-हावडा
अमरावती-मुंबई
कोल्हापूर-गोंदिया
हावडा-मुंबई
नांदेड-श्रीगंगानगर
आरक्षित तिकीट नको रे बाबा
विशेष गाड्यांमध्ये सामान्य डबे नसल्याने केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करावा लागतो. जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण वेटिंगवर असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वेळेवर प्रवास करावयाचा झाल्यास आरक्षण मिळत नाही. शिवाय आरक्षणाचे तिकीट दरही जास्त आहेत. त्यामुळे रेल्वेने आता आरक्षणाची सक्ती न करता जनरल तिकीट सुरू करावे, अशा भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.
असा आहे फरक
अकोला ते मुंबई प्रवासासाठी साधारण डब्यात प्रवास करावयाचा असल्यास पूर्वी केवळ २०० रुपये लागायचे. आता आरक्षित तिकीट काढावे लागत असल्याने तब्बल ३७० रुपये मोजावे लागतात. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये तर मुंबईसाठी ४१५ रुपयांचे तिकीट काढावे लागते. नागपूरसाठी पूर्वी जनरलमध्ये प्रवास केल्यास ११५ रुपये मोजावे लागत होते. आता जवळपास २०० रुपये खर्च करावे लागतात.
\Iविशेष रेल्वेमध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षित तिकिटाचे दर जास्त असतात. शिवाय दैनंदिन पास व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.\I
\I- मनोहर कंठाळे, अकोला\I
\Iपूर्वी रेल्वेचा प्रवास हा स्वस्त बसच्या तुलनेत स्वस्त होता. आता सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये जनरल सीटिंग ही कॅटेगिरीच नसल्यामुळे आरक्षित जागांसाठी २० ते २५ रुपये जास्त आकारले जात आहेत. दररोज प्रवास करणाऱ्यांना हे परवडणारे नाही.\I
\I- केशवराज खातखेडे, अकोला\I