आणखी किती खेळाडू प्रशिक्षकाची ‘शिकार’ होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:31 PM2018-08-06T15:31:54+5:302018-08-06T15:38:41+5:30
ज्या अकोला जिल्ह्याचे नाव देशपातळीवर क्रीडाक्षेत्रात आदराने घेतल्या जाते, त्या अकोल्यातदेखील आता एक नव्हे, तर तब्बल लागोपाठ तीन लैगिंक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
- अॅड़. नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : स्त्रियांच्या शोषणाचा मुद्दा भारतीयांसाठी नवा नाही. द्रौपदीपासून तर आसिफापर्यंत अशा कितीतरी महिला-बालिका वासनाधांच्या शिकार बनल्या आहेत. कारणं वेगळी असली तरी गुन्हा एकच असतो. याला स्थळ, काळ, वेळ याच्या मर्यादा नसतात. भारतीय क्रीडा क्षेत्रही यापासून वंचित नाही. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय ते थेट आता खेड्या-पाड्यापर्यंत ही घाणेरडी कीड लागली आहे. ज्या अकोला जिल्ह्याचे नाव देशपातळीवर क्रीडाक्षेत्रात आदराने घेतल्या जाते, त्या अकोल्यातदेखील आता एक नव्हे, तर तब्बल लागोपाठ तीन लैगिंक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
काही मिळवायचे असेल, तर काही गमवावे लागेल, असा अलिखित नियम सध्या रू ढ होऊ लागला आहे. याचाच परिपाक म्हणजे महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना संघात संधी देण्याचे किंवा खेळात पुढे आणण्याचे आमिष देऊन, तिथे स्त्री शरीराच्या शोषणाचा मार्ग निर्माण केला जातो. परंतु, अशा दुर्दैवी पद्धतींना आपल्याकडे कोणी रोखण्याचा प्रयत्न करीत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन आता कबड्डी सारख्या पारंपरिक खेळातही निंदनीय घटना होईल, असे वाटले नव्हते. जिम्नॅस्टिकचा प्रशिक्षक मुकेश तुंडलायत, बॅडमिंटनचा प्रशिक्षक राहुल सरकटे आणि आता कबड्डीचा प्रशिक्षक शुद्धोधन अंभोरे यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने पोलिसी कारवाई करण्यात आली. पहिले दोन प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. जिम्नॅस्टिक खेळातील प्रकार हा शासकीय क्रीडांगणातच घडला आणि ही बाब तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यामार्फतच उघडकीस आली. तर बॅडमिंटन आणि कबड्डी खेळातील हा घृणास्पद प्रकार खासगी इमारत व मैदानात घडला आहे. जिम्नॅस्टिकचा प्रशिक्षक जिल्हा संघटनेचे सचिवपदही भूषवित होता. मात्र, बॅडमिंटन आणि कबड्डीच्या प्रशिक्षक यांचा आमच्या संघटनांशी संबंध नाही, असे सांगून जिल्हा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले हात वर केलेले आहेत. मग, या प्रशिक्षकांची नेमणूक करतो कोण, ज्या शाळांचे विद्यार्थी व पालक आपल्या पाल्यांना अशा प्रशिक्षकांकडे खेळ प्रशिक्षण व सरावासाठी पाठवतात, ते त्या प्रशिक्षकांची पूर्ण चौकशी करतात का, असे एक नाही अनेक प्रश्न समाज मनाला पडलेले आहेत. खर तर प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांची जबाबदारी असते आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची. मात्र, अपवाद वगळता अनेक क्रीडा शिक्षक मैदानावरील वरिष्ठ खेळाडू किंवा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूकडे जबाबदारी सोपवून शालेय संघ क्रीडा स्पर्धांसाठीही त्यांच्याच भरवशावर पाठवत असतो.
प्रशिक्षकांची जबाबदारी कोण घेणार
प्रशिक्षकांची अधिकृत नोंदणी कोणत्याही संघटनांकडे नाही किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्येही याची कोठेही नोंद केलेली नसते. परंतु, अशा घटना आता रोखण्यासाठी क्रीडा संघटनांनी कठोर पावले उचलून, प्रशिक्षित व उच्चशिक्षित प्रशिक्षकांची नेमणूक प्रशिक्षकपदी केल्यास, भविष्यात अशा घटना होणार नाही. शासनानेदेखील याबाबत गांभीर्याने आता विचार करणे गरजेचे झाले आहे. क्रीडा संघटनांचे शुद्धीकरण करण्याचीही वेळ आलेली आहे. अकोल्यात घडलेल्या या गंभीर घटनांची दखल आता संबंधित राज्य संघटनांनी घेतली पाहिजे. स्पोर्टस् अॅथॉरिटी आॅफ इंडिया, आॅलिम्पिक संघटना या शिखर संस्थांच्या प्रतिनिधींनीदेखील उच्च स्तरावरील खेळाडूंच्या समस्यांच्या तक्रारींची दखल घेत असतानाच छोट्या शहरांमधील खेळाडूंच्या समस्यांकडे आपल्या प्रतिनिधींमार्फत लक्ष ठेवणे आवश्यक झालेले आहे.
अकोल्यात लागोपाठ तीन प्रकरणं घडल्यानंतरही अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून याबाबतची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. एकाही क्रीडा अधिकाºयांने याबाबत उवाच काढलेला नाही. जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मूग गिळून बसलेले आहेत, तर लोकप्रतिनिधींना क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पालकांनीदेखील आपल्या पाल्यांना मैदानावर पाठविताना क्रीडा संघटना, क्लब, मंडळ, प्रशिक्षक आदीबाबत पूर्ण चौकशी करणे आवश्यक आहे. तेवढेच पाल्यांच्या हालचालीकडे, त्याच्या मानसिकतेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
बोगस प्रशिक्षक व क्लबचा सुळसुळाट
सद्यस्थितीत क्रीडा क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. क्रीडा सवलत गुणही विद्यार्थ्यांना मिळतात. नोकरीतही खेळाडूंना पाच टक्के आरक्षण आहे. या गोष्टींचा फायदा समाजकंटक घेत आहेत. या पृष्ठभूमीवर शहरात बोगस क्रीडा प्रशिक्षक व क्लबचा सुळसुळाट झालेला आहे. यावर अंकुश कोणाचाच नाही. आपला पाल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा किंवा खेळाडूंनादेखील वाटते आपण भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करावे, या सुलभ भावनांचा फायदादेखील बोगस क्रीडा संघटना व प्रशिक्षक घेत आहेत. शहरात अनेक अनधिकृत क्लब चालताना दिसतात. हे क्लब अनधिकृत आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांना खेळाडूंना घेऊन जातात. या क्रीडा स्पर्धांना शासनाची किंवा अधिकृत खेळ संघटनांची परवानगी नसते.
घटना रोखण्यासाठी हे करता येईल
क्रीडा संघटनांनी प्रशिक्षकांची नाव नोंदणी करावी.
प्रशिक्षित व उच्चशिक्षित प्रशिक्षकांची अधिकृत नियुक्ती करावी.
नियुक्त प्रशिक्षकांची यादी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे पाठवावी.
प्रशिक्षण वर्ग किंवा केंद्र चालविण्याची परवानगी क्रीडा कार्यालयाकडून घ्यावी.
मैदान निरीक्षण समिती शासनाने नेमून दर महिन्याला अहवाल मागवावा.
मुख्य प्रशिक्षक, प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक व मदतनीस यांची यादी प्रशिक्षण केंद्रात असावी.
पालकांनी घ्यावयाची काळजी
प्रशिक्षण केंद्र अधिकृत व नोंदणीकृत आहे का, याची चौकशी करावी.
प्रशिक्षकाची नेमणूक कोणामार्फत झालेली आहे, हे पाहावे.
ज्या स्पर्धांना पाल्यांना पाठवितो, ती अधिकृत आहे का, याची खात्री करू न घ्यावी.
आठवड्यातून किमान एकदा पाल्याची प्रगती पाहाण्यासाठी मैदानावर जावे.
पालक-प्रशिक्षक यांच्यात संवाद असावा.
खेळाडूंनी काय करावे!
आपल्यासोबत काही गैर होत आहे, याबाबतची माहिती पालकांना द्यावी.
घटनास्थळावर ओरड करू न आपल्या संघ सहकाºयांची मदत घ्यावी.
सर्व खेळाडू मिळून अशा व्यक्तीविरोधात आवाज उठवावा.
वेळीच पोलिसांची मदत घेऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार करावी.