वारी हनुमानमध्ये प्रशासनाला अजून हवेत किती तरुणांचे बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:54+5:302021-09-12T04:22:54+5:30

तेल्हारा : वारी (हनुमान) निसर्गसौंदर्याने नटलेले शिवकालीन धार्मिक पर्यटनस्थळ. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मंदिरानजीक असलेल्या आड व ...

How many young victims are still in the air in Wari Hanuman? | वारी हनुमानमध्ये प्रशासनाला अजून हवेत किती तरुणांचे बळी?

वारी हनुमानमध्ये प्रशासनाला अजून हवेत किती तरुणांचे बळी?

Next

तेल्हारा : वारी (हनुमान) निसर्गसौंदर्याने नटलेले शिवकालीन धार्मिक पर्यटनस्थळ. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मंदिरानजीक असलेल्या आड व वान नदीमधील मामा-भाचा व राजन्या डोहमधील पाणी पाहिल्यानंतर पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही; मात्र या डोहामधील अंतर्गत रचनेचा अभ्यास नसल्यामुळे या डोहाच्या कपारीत अडकून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये २०० च्या वर पर्यटक बुडाल्याच्या नोंदी हिवरखेड व संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या अभिलेखामध्ये आहेत. विशेष म्हणजे बुडून मरण पावणारे पर्यटक २५ वर्षांच्या आतील आहेत.

गेल्या चार वर्षांपासून युवाशक्ती संघटना संचालित, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत वान फाउंडेशनने या डोहामध्ये उपाययोजना व्हाव्या, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी या डोहांची पाहणीसुद्धा केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मामा-भाचा डोह उपाययोजना समितीसुद्धा स्थापन झाली. नावीन्यपूर्ण योजनेमधून या उपाययोजना करण्याचेसुद्धा ठरले होते. पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाकडून ७६ लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रकसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाले. या अंदाजपत्रकामधील त्रुटी दूर करून उपाययोजना दीर्घ मुदतीच्या व्हाव्या, ही वान फाउंडेशनची सूचना मान्य करून सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पाटबंधारे विभागातील अंतर्गत वादात असंवेदनशील असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेच्या आत अंदाजपत्रक सादर केले नाही. पुढे आचारसंहिता निवडणुका व शासन बदलल्यामुळे उपाययोजनांची कार्यवाही खोळंबली.

-----------------------

ऑगस्ट महिन्यात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

मागील ऑगस्ट महिन्यात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात उपाययोजनांचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने सादर करण्याची मागणी वान फाउंडेशनचे उत्तम नळकांडे यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपाययोजनांच्या कार्यवाहीत खूपच दिरंगाई झाली असल्यामुळे प्रशासनाला अजून किती तरुणांचे बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल वान फाउंडेशनने केला आहे.

Web Title: How many young victims are still in the air in Wari Hanuman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.