वैद्यकीय तपासण्यांसाठी आणखी किती हेलपाटे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:27+5:302021-09-18T04:20:27+5:30
सर्वोपचार रुग्णालयात आता नॉनकोविड रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. विविध आजारांच्या निदानासाठी गावखेड्यातील रुग्ण सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एक्स-रेसाठी सर्वोपचार ...
सर्वोपचार रुग्णालयात आता नॉनकोविड रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. विविध आजारांच्या निदानासाठी गावखेड्यातील रुग्ण सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एक्स-रेसाठी सर्वोपचार रुग्णालयात येतात. रुग्णासोबतच त्यांचे नातेवाईकही येथे येतात, मात्र एका चाचणीसाठी त्यांना दोन ते तीन दिवस सारख्या चकरा माराव्या लगत असल्याचे चित्र पहावयास मिळते. शुक्रवारीदेखील असाच काहीसा प्रकार पहावयास मिळाला. सीटी स्कॅनसाठी सकाळपासूनच रुग्णांची रांग लागली होती, मात्र येथील सीटी स्कॅन मशीन अचानक बंद पडली. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना उद्या येण्यास सांगितले. सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याने रुग्णांना हा त्रास सहन करावा लागतो, मात्र अनेकदा डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णांना परतावे लागते. वैद्यकीय तपासणीसाठी आणखी किती हेलपाटे घ्यावे लागतील, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
उपचार स्वस्त तेवढा महागडा झाला
खासगी रुग्णालयात सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे गोरगरीब रुग्ण उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासह विविध चाचण्यादेखील करून घेतात, मात्र या ठिकाणी एका फेरीत काम होत नसल्याने रुग्णांना वारंवार चकरा माराव्या लागतात. परिणामी रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत असून, शासकीय उपचार स्वस्त तेवढा महाग ठरत आहे.
काय म्हणतात रुग्ण..
मुलीचा सीटी स्कॅन काढण्यासाठी सकाळपासूनच रांगेत उभे आहोत. आता कुठे नंबर लागेल म्हणून दिलासा मिळाला होता, मात्र मशीन बंद पडल्याचे सांगण्यात आले. आता उद्यापण रांगेतच राहावे लागते की आणखी चकरा माराव्या लागतात देव जाणे.
गोकर्णा तायडे, रुग्ण नातेवाईक
रुग्णाच्या डोक्याचा सीटी स्कॅन काढायचा होता. त्यासाठी आम्ही सकाळपासूनच रांगेत होतो, मात्र सीटी स्कॅन मशीन बंद झाल्याचे सांगत आम्हाला उद्या बोलावण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मिर्झा बेग, रुग्ण नातेवाईक