सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? सगळेच पास, मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:01+5:302021-08-13T04:23:01+5:30
अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला ...
अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्याने आता सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकारामुळे अकरावी प्रवेशाचा गुंता आणखीच वाढला आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून, मूल्यमापनाच्या आधारे जिल्ह्यातील २५,६३३ पैकी २५,६३१ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. दहावीत केवळ दाेनच विद्यार्थी नापास झाले हाेते, तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागा कमी असल्याने दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीत प्रवेश कसा मिळेल हा प्रश्नच आहे, मनासारख्या कॉलेजला प्रवेश मिळावा याकरिता सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, उच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली आहे. अकरावीचे प्रवेश नेमके कसे होणार, याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी १८,२०० जागा उपलब्ध आहेत. मनासारखे कॉलेज मिळविताना विद्यार्थ्यांची कसरत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
००००००००००००००००
विद्यार्थी स्थिती...
दहावीतील विद्यार्थी-२५,६३३
पास विद्यार्थी-२५,६३१
अकरावीची प्रवेशक्षमता १८,२००
शहरातील कनिष्ठ महाविद्यालये-५४
एकूण जागा-८,९५५
००००००००००००००००
विद्यार्थी चिंतित...
अकरावी प्रवेशासाठी सीईटीची तयारी केली हाेती मात्र ती रद्द झाल्याने आता प्रवेश काेणत्या आधारावर दिला जाईल याचीच चिंता आहे. मार्गदर्शक सूचना लवकर यायला हव्या.
- पार्थ भवाने
विद्यार्थी
....
अकरावीचे प्रवेश केव्हा आणि कसे होणार याबाबतही काेणतीही माहिती नाही, मनासारखे काॅलेज मिळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. मार्गदर्शक सूचना आल्या तर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश लवकर घेता येईल.
- अर्चना काटे
विद्यार्थिनी
०००००००००००००
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार !
अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा कटऑफही वाढणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश झाले, तर ९० टक्क्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला पसंतीचे कॉलेज मिळविताना कसरत होण्याची शक्यता आहे.
०००००००००००००००००