दररोज २६३० चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 10:42 AM2020-12-05T10:42:00+5:302020-12-05T10:42:13+5:30
Akola Corona News २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ १९ टक्केच चाचण्या होत आहेत.
अकाेला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्याला २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ १९ टक्केच चाचण्या होत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत कोविड चाचण्यांचे दररोजचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात दररोज जवळपास दीड लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाच्या सचिवांनी सर्व जिल्हे व महापालिकांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी ६५ टक्के चाचण्या आरटीपीसीआर आणि २५ टक्के चाचण्या ॲन्टिजन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, अकोला जिल्ह्याला २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात दररोज जवळपास ५०० चाचण्या केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ १९ टक्के आहे. जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांची उदासीनता असल्याचे दिसून, येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज चाचण्या कराव्या लागणार - २,६३०
सध्या दररोज चाचण्या होत आहेत. - ५००
चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य
जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक जण चाचण्या करण्यास टाळत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांमध्ये चाचणीविषयी असलेली भीती घालविल्यास चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य आहे.
काेरोनाला हरविण्यासाठी आराेग्य विभाग सर्वच स्तरावर प्रयत्न करत आहे; मात्र अनेक ठिकाणी नागरिकांकडून चाचणीला नकार देत आहेत. ॲन्टिजनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर आहे. चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला