कसे शिकविणार...? शिकवण्याच्या परीक्षेत शिक्षकच नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:24 PM2019-06-25T13:24:28+5:302019-06-25T13:24:32+5:30
जिल्ह्यातील १४ पैकी १० शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत.
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील १४ पैकी १० शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्यक्ष घेतलेल्या शिकवण्याचा पाठातून पुढे आला आहे. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, यावर शिक्षण समितीकडून ठराव घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी सांगितले.
जिल्ह्यातील शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी समिती गठित केली. पाच सदस्यीय समितीमध्ये संस्थेचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता विस्तार अधिकारी परोपटे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांचा समावेश होता. समितीसमोर १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. तर सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. उत्तीर्णतेसाठी ३५ टक्के गुणापर्यंतही शिक्षक पोहोचले नाही. त्यांच्या शैक्षणिक, अध्यापन गुणवत्तेचे समितीसमोर वाभाडे निघाले आहे. या शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी सुधारणार, हा प्रश्नही पुढे आला. आता त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, याबाबतची चर्चा शिक्षण समिती, पदाधिकारी करणार आहेत.
- या शिक्षकांचा लागला निकाल...
७ जून रोजी मोºहळ येथील नलिनी तायडे, मोझरी येथील साहेबराव लोणाग्रे, पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड-गोपाल लोखंडे, प्रवीण कºहाळे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, कोठारी- अनिल चºहाटे, साईनगर- मोरताळे, देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे, कळंबेश्वर- जी. पी. कोल्हे, पातूरचे गटसमन्वयक के.डी. चव्हाण यांनी समितीसमोर पाठाचे सादरीकरण केले. त्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी २० मिनिटे देण्यात आली होती. समितीने केलेल्या परीक्षणानंतरचा निकाल धक्कादायक आहे.
- मुख्याध्यापकांचीही झाडाझडती
रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांचीही तपासणी झाली आहे. त्यांचा निकाल बाकी आहे.