एचआरसीटी स्काेर १६, ऑक्सिजन लेव्हल ७०, वय ८६, तरीही केली काेरोनावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:59+5:302021-04-26T04:15:59+5:30
अकाेट : काेराेनाचा वाढता उद्रेक अन् मृतांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक रुग्णांनी धास्ती घेतली आहे. मात्र, याेग्य ...
अकाेट : काेराेनाचा वाढता उद्रेक अन् मृतांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक रुग्णांनी धास्ती घेतली आहे. मात्र, याेग्य वेळी झालेले उपचार, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काेराेनावर मात करणे काेणत्याही वयात शक्य आहे हे अकाेट येथील ८६ वर्षीय विठ्ठलराव शेगोकार यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा एचआरसीटी स्काेर १६, ऑक्सिजन लेव्हल ७० असतानाही त्यांनी धीर न साेडता वैद्यकीय उपचारांना सकारात्मक सामाेरे जात काेराेनासाेबतचे युद्ध जिंकले आहे.
विठ्ठलराव अकाेट येथील नंदकिशोर शेगोकार यांचे काका. त्यांना श्वास घ्यायला त्रास हाेऊ लागला, काेराेनाची लक्षणेही दिसली. त्यामुळे त्यांची काेराेना चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या हृदयाचे सीटी स्कॅन केले तर एचआरसीटी स्काेर हा १६ आला. त्यांना श्वास घेण्यासही त्रास हाेत हाेता. कारण, त्यांची ऑक्सिजन लेव्हल ही ७० पर्यंत खाली घसरली हाेती. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, ऑक्सिजन देण्यात आला. या स्थितीतही विठ्ठलरावांनी धीर साेडला नाही. डाॅक्टरांनी सांगितल्यानुसार उपचारांना प्रतिसाद दिला. काेराेना रुग्णाच्या बाबतीत एक दुर्दैव असे की, त्यांच्या सेवेसाठी काेणीही आप्त जवळ राहू शकत नाही. त्यामुळे रुग्णाला हवाहवासा आधार मिळत नाही. अशा स्थितीत रुग्णांची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरते. विठ्ठलराव म्हणाले की, या आजारामध्ये आपल्या परिवारातील कोणीच सोबत नसतो किंवा दिसत नाही, तेव्हा घाबरून न जाता त्याला समोर जा व या आजाराचा सामना करा व एकच विचार करा, तो म्हणजे मला बरे होऊनच घरी जायचे आहे. असा प्रचंड विचार मनाशी बाळगा म्हणजे आपण लवकर बरे होऊ. रुग्णालयातील होत असलेल्या मृत्यूकडे लक्ष देऊ नका. कोरोना आजार जास्त मोठा आजार नाही. वेळीच उपचार घेतल्यास आपण निश्चित बरे होऊ शकतो. मी तेच केले. त्यामुळेच आज काेराेनामुक्त हाेऊन पुन्हा नातवंडांसाेबत रमलाे आहे.
काेट
कोरोनाचा काळ हा काही दिवस आहे. हे दिवसपण निघून जातील. आजाराला न घाबरता सरळ चाचणी करा, उपचार घ्या, आपल्या जीवनाकडे, परिवाराकडे व निसर्गाकडे पहा, म्हणजे जीवन जगण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल व हीच इच्छा तुम्हाला तुमच्या औषधांना सकारात्मक प्रतिसाद देते.
विठ्ठलराव शेगोकार