अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:44 PM2020-07-16T13:44:05+5:302020-07-16T17:31:41+5:30
फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के लागला आहे.
अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार, १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला असून, यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के लागला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. एकूण निकालामध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१५ टक्के एवढी आहे. यावर्षीसुद्धा निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ५२९ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २३ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९०.८० अशी आहे. उत्तीर्ण २३ हजार १०९ विद्यार्थ्यांमध्ये ११९८४ मुले व १११६१ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.८८ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९४.१५ टके अशी आहे.
पातूर तालुका अव्वल
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा ९३.०८ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अकोला तालुका ९२.८५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ९१.१३ टक्के, मूर्तिजापूर तालुका ९०.३८ टक्के, अकोट तालुका ८८.९१ टक्के, बाळापूर तालुका ८६.९८ टक्के व तेल्हारा तालुका ८४.९१ टक्के असा क्रम आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९७. ७१ टक्के
जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.८० टक्के लागला असून, यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणून ९७.७१ टक्के लागला आहे. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९५ टक्के, कला शाखा ८२.६६ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.११ टक्के लागला आहे.