अकोला जिल्ह्यात वाढली हुडहुडी; तीन दिवसांत पारा ५ अंशांनी घसरला!
By रवी दामोदर | Published: January 16, 2024 07:13 PM2024-01-16T19:13:54+5:302024-01-16T19:14:08+5:30
किमान तापमान १२ अंशावर : वाढलेली थंडी रब्बी पिकाला पोषक
रवी दामोदर, अकोला
अकोला : सध्या उत्तर भारतात थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५ अंशांनी पारा घसरला असून, पहाटेच्या सुमारास हुडहुडी वाढली आहे. मंगळवार, दि.१६ जानेवारी रोजी पारा १२.३ अंशावर होता. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगामी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडी, गारठा वाढला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी लहानग्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवसादेखील उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. स्वेटर, कानटोपी, मफलरचा, जॅकेट घालून घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर शहरासह ग्रामिण भागातही शेकोटी पेटण्यास सुरूवात झाली आहे. तापमानाचा पाराही सातत्याने खाली सरकत आहे. त्यात मंगळवारी दि.१६ जानेवारी रोजी अकोल्याचे तापमान विदर्भात कमी नोंदविल्या गेले. जिल्ह्याचे तापमान कमाल ३०.८ तर किमान १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे सकाळपासून दिवसभर हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांनी घेतला. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे, सकाळी व रात्रीच्यावेळी थंडीचा जोर तसेच वारेही वाढले आहे. दिवसभर हुडहुडणारी थंडी अनुभवायास मिळत असल्याने उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही आता शेकोट्या पेटल्याच्या पहावयास मिळत आहे.
-------------------------------
विदर्भातून सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळनंतर अकोल्यात
अकोला सार्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून अनेक वेळा नोंद होते. परंतू गत दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, पारा घसरला आहे. मंगळवारी विदर्भातून सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली असून, त्यापाठोपाठ अकोला जिल्ह्यात नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसात पारा ५ ते ६ अंशांनी घसरला असून, किमान तापमान १२.३ अंशावर होते.
---------------------------------------------
असे आहे विदर्भातील जिल्ह्याचे किमान तापमान
जिल्हा - किमान तापमान
अकोला - १२.३
अमरावती - १३.५
बुलढाणा - १२.६
चंद्रपूर - १४.४
गडचिरोली - १४.२
गोंदिया - १२.४
नागपूर - १४.२
वर्धा - १४.०
वाशिम - १४.०
यवतमाळ - ११.५