सततच्या सुट्ट्यांनंतर बँकेत प्रचंड गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:33+5:302021-04-06T04:17:33+5:30
मूर्तिजापूर : सततच्या सुट्ट्यांनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी बँकेत मोठी गर्दी केली होती. शहरातील काही बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा दिसून ...
मूर्तिजापूर : सततच्या सुट्ट्यांनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी बँकेत मोठी गर्दी केली होती. शहरातील काही बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सतत आलेल्या सुट्ट्यांनंतर सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी नागरिकांनी सकाळपासून बँकेसमोर गर्दी केली होती. बँक परिसरात ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा पार बोजवारा उडाल्याचे दिसून आले. गर्दीत काहींनी मास्क किंवा रुमाल बांधलेला नसल्याचेही दिसून आले. तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांची बेफिकिरी घातक ठरत आहेत. अनेक बँकांबाहेर सुरक्षारक्षक नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धची कारवाई ठंडावल्याने नागरिक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. शहरात किराणा, औषधी, भाजीपाला दुकानासह बँकेत ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.